भाजपा आमदार नितेश राणे यांनी दिली होती उद्योगमंत्र्यांकडे नादुरुस्त रस्त्यांची यादी
कणकवली | उमेश परब : कणकवली,देवगड,वैभववाडी या मतदार संघाचे आमदार नितेश राणे यांनी CRF कडून निधीसाठी १९ रस्त्यांच्या कामांची यादी सादर केली आहे. या विकासकामांसाठी एकूण १९६ कोटी खर्च अपेक्षित आहे. रस्त्यांच्या सुधारणीसाठी हा निधी देण्यात यावा, अशी मागणी केंद्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.
कोकण हा डोंगराळ प्रदेश आहे. या क्षेत्रात वार्षिक सरासरी पाऊस हा खूप जास्त पडतो. तसेच राज्य सरकारने सुरु केलेल्या विविध प्रयोगांमुळे हा प्रदेश विकासाच्या बाबतीत अजून मागेच आहे. सिंधुदुर्गात होत असलेलं विमानतळ तसेच इतर विकास प्रकल्पांमुळे सिंधुदुर्गातील रस्त्यांची पायाभूत सुविधा सुधारण्याची गरज आहे.
कणकवली, देवगड व वैभववाडी या तीन तालुक्यांतील रस्त्यांच्या कामांची आम. नितेश राणे यांनी तयार केलेली यादीही केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पाठविली आहे. CRF कडून हा निधी मंजूर करण्यात यावा, अशी विनंती नामदार नारायण राणे यांनी नामदार नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.