पूर्वी आणि आता…. (कवयित्री : सौ.सुप्रिया प्रभुमिराशी ,कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग .)
पूर्वी आणि आता…!
जात असत पूर्वी, पसंत करण्या मुलगी ती “कोवळी”,
आता “साठी”चीही प्रपोज करते सावरीत तिची “कवळी!”
त्यावेळी तर घरदारा संस्कार देऊनी सांभाळायचे,
सौभाग्यवतीने जीव लावुनी प्रत्येकाचे करायचे!….
“तिकडचे” किंवा ” स्वतःनी” म्हणायचे स्वारीला,
हळूहळू सारे शिकुनी ती घेई ओटीत संस्काराला..!
अतिकष्टाने प्रेमादरे बांधुनी ठेवितसे घराला,
तितक्याच प्रेमाने जीव लावुनी तीच बांधी गाय वासराला...!
आता त्याचिया उलट जाहले, कुणी कुणाचे झाले?
आले गेले कुणीही, परि तिज नाही विचारले..!
मुले राहती परदेशी अन् पती स्वर्गवासी,
असुनी पैसा, कुणिही नाही एकटी राहील कैसी..?
म्हणुनी आता मॅरेज ब्युरो निघाले मोठ्या शहरातुनी,
करून घेती ओळख, गप्पा भेटी संमेलनातुनी!….
प्रश्न बदलले वधू वरांचे, बदलुनी गेला काळ,
सोबत शोधू, ना इलाज तो, नाहीतर लागेल खूळ..!…
ब्लड प्रेशर, डायबेटीस, सांधेदुखी, बहिरेपण खरे सोबती झाले,
कमी दिसण्याचे वयही आले, अशक्त डोळे झाले…!.
औषध घेऊ वेळच्यावेळी , कुणी नाही जपण्यासी,
तुम्ही मला अन् मीच तुम्हाला आहे सांभाळण्यासी..!…
हवी सोबतीस म्हणुनी आलो, जगाचा नको ध्यास,
म्हणतील ते ते खुशाल म्हणुन दे, “तू हक्काचा मम श्वास..!”…
जे असेल ते दोघे मिळुनी राहू आनंदात,
एकमेका सोबत आपुली होईल वृद्धपणात…!…
काय राहीले तसे आताही नव्याने जगायाचे?नामस्मरणी मिळुनी बैसु, क्षण ते आनंदाचे..!…
भूतकाळ तो विसरूनी जाऊ, मित्र मैत्रीण होऊ,
देहदान करूनी मग आपण देवापाशी जाऊ..!…
माझे माझे भ्रम ओझे हे कशाला आता वाहू?
एकटेच आलो, जाऊ एकटे मनास तसे बजावू..!…
विश्वासाने असे सदोदीत हात गुंफुनी राहू,
तुझे न माझे, असे आपुले या दृष्टीने पाहू..!…
कुणी नसे हो अंती कुणाचे, अहंकारही फुकाचे,
समजुनी येण्या साठ_ सत्तरी कारण ते दुःखाचे..!..
पेक्षा सोबत_ मैत्री चांगली क्षण हो आनंदाचे,
करार करूनी मैत्री जपुया जीवन साफल्याचे..!
( आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल )
व्वा एकदम मस्त 👍