शिरगांव वारकरी संप्रदायाच्या माघ महिन्यांतील समता पायीदिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान..!
शिरगांव | संतोष साळसकर (विशेषवृत्त):
“वसा वारीचा हा घेतला पावलांनी…”, अशा व्रतस्थ आस्थेने ,”हरी मुखे म्हणा..हरी मुखे म्हणा..पुण्याची गणना कोण करी…बोला पुंडलिक वरदे ..हरी विठ्ठल” जयघोषात.. टाळमृदुंगाच्या गजरात.. विठ्ठल नामाचा अखंड जयघोषात देवगड तालुक्यातील शिरगांव वारकरी संप्रदायाची माघ महिन्यातील समता पायी दिंडीने शनिवार दिनांक २९ जानेवारीला शिरगांव बाजारपेठ येथील श्री हनुमान मंदिर येथून श्री क्षेत्र पंढरपूर कडे प्रस्थान केले.
या पायी वारीचा शुभारंभ ग्रामदैवत श्री पावणाई देवालयात प्रथम श्रीफळ व विनंती ठेऊन करण्यात आला.शिरगांव बाजारपेठेत सर्व वारकर्यांनी रिंगण करून टाळमृदुंगाच्या गजरात विठ्ठलनामाचे अभंग गायनातून समरसले .
यावेळी सर्व वारकरी भक्तिरसात न्हाऊन निघाले होते. त्यानंतर ओम गणेश मंदिरात आरती केली गेली. यावेळी ओम गणेश मंडळाचे विश्वस्त ,पदाधिकारी उपस्थित होते.तेथून राक्षसघाटी येथे श्री. राजू परब यांच्या निवासस्थानी अल्पोपाराची व्यवस्था करण्यात आली होती. हडपीड येथील श्री गणेश मंदिर,श्री स्वामी समर्थ मठ,श्री दत्त मंदिर,कोळोशी येथील श्री विठ्ठल मंदिर आदी ठिकाणी आरती करण्यात आली.नांदगांव येथील प्रमोद लोके यांच्या निवासस्थानी महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला.शिरगांव येथून निघालेली पायी दिंडी कणकवली तालुक्यातील लोरे नं १ येथे सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी माघ वारी समता पायी दिंडीमध्ये सहभागी होणार आहे.यावेळी या पायी दिंडीचे प्रमुख ह.भ.प.सर्वोत्तम साटम महाराज यांनी जगावर असलेले कोरोनाचे संकट दूर होऊन पुन्हा एकदा सर्वांना आनंदी दिवस बघता यावेत असे पांडुरंगाला साकडे घालणार असल्याचे सांगितले.
आता पायी दिंडीच्या वारकर्यांची आस आहे ती चंद्रभागेच्या तीरावरील मंदिरात विटेवर उभ्या असलेल्या विठू माऊली मंदिराच्या कळसाची आणि मुख दर्शनाची..!