कणकवली / उमेश परब : नुपुर कला मंदिर, कणकवली या कथ्थक नृत्य वर्गाच्या गौरी प्रफुल्ल कामत आणि मानसी सतिश मसुरकर यांनी कथ्थक विशारद पूर्ण या परिक्षेत प्रथम श्रेणीत यश मिळविले आहे.
अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालयातर्फे घेण्यात येणा-या कथ्थक नृत्य मधील प्रारंभिक परिक्षा त्यांनी २०११ साली दिली होती. त्यानंतरचा त्यांचा कथ्थक नृत्याचा प्रवास यशस्वी होण्यासाठी त्यांनी प्रामाणिक नृत्यसाधना केली. कोव्हीड कालावधीमध्ये परिक्षा आणि रियाज होऊ न शकल्यामुळे विशारद पूर्ण होण्यास २०२१ साल उजाडले.
कथ्थक नृत्याच्या या १० वर्षांच्या यशस्वी प्रवासात दोघींना नुपुर कलामंदिरच्या संचालिका अनुजा गांधी गुरू म्हणून लाभल्या. त्यांनी केलेल्या अमूल्य मार्गदर्शनामुळे त्यांचा हा प्रवास यशस्वी झाल्याचे गौरी आणि मानसी म्हणाल्या. तसेच अमित आणि अतुल या उमळकर बंधूंचे मोलाचे सहकार्य वाद्यसाथीसाठी मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
कथ्थक मधील पुढील वाटचाल अशीच चालू ठेवणार असून कथ्थकचा प्रसार आणि प्रचार जास्तीत जास्त व्हावा यासाठीही आपण प्रयत्नशील राहणार असल्याचा मानस गौरी आणि मानसी यांनी व्यक्त केला आहे. गौरी ही भाजपा महिला आघाडीच्या माजी तालुकाध्यक्षा गीतांजली कामत यांची तर मानसी ही कणकवली बाजारपेठेतील सुवर्णकार सतीश मसुरकर यांची सुकन्या आहे.