मालवण | प्रतिनिधी : मालवण वायरी येथील अनिकेत अनिल फाटक यांच्या आंबा क्षेत्रावर महाराष्ट्र शासन कृषि विभाग,तालुका कृषि अधिकारी कार्यालय मालवण व कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा(आत्मा)सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमानाने आंबा मोहोर संरक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवर तसेच शेतकऱ्यांचे स्वागत करून झाल्यानंतर मंडळ कृषि अधिकारी मालवण श्री. एस. जी. परब यांनी आंबा मोहोर व त्यावरील मुख्य म्हणजे फुलकीडीचा तसेच तुडतुडे यांचा प्रादुर्भाव सुरुवातीपासून झाल्यास त्याचा परिणाम आंबा उत्पादनावर होतो त्यासाठी आंबा मोहोर संरक्षण व योग्यरित्या व्यवस्थापन करणे महत्वाचे आहे असे कार्यक्रमाच्या प्रस्तावनेतून सांगितले.
यावेळी प्रादेशिक फळसंशोधन केंद्र वेंगुर्ला येथील शास्त्रज्ञ डॉ.गोपाळ गोळवणकर,कृषि पर्यवेक्षक मालवण श्री.डि. डि.गावडे, वायरी गावचे सरपंच श्री. भगवान लुडबे, ग्रामपंचायत सदस्य श्री. देवानंद लुडबे, फळ पीक विमा प्रतिनिधी मालवण प्राणिल नार्वेकर, पत्रकार प्रतिनिधी संदीप बोडवे, कृषिसेवक मालवण श्री. के. एस. कदम तसेच वायरी – मालवण येथील प्रगतशील आंबा उत्पादक शेतकरी सुभाष पाटकर, जयवंत लुडबे, रामचंद्र लुडबे, गणेश लुडबे, भालचंद्र बोडवे, मेघ:श्याम लुडबे, अशोक हडकर, आनंद गावकर, चंद्रशेखर मांजरेकर, रत्नाकर कोळंबकर, राहुल नरे, नंदन लुडबे, शशिकांत पाटकर, दाजी हडकर इ उपस्थित होते.
शास्त्रज्ञ डॉ.गोळवणकर यांनी मार्गदर्शन करताना आंबा पिकातील मुख्य किडी तसेच रोग याविषयी चित्रीकरणासह सखोल माहिती दिली.दरम्यान श्री.अनिकेत फाटक यांच्या आंबा प्रक्षेत्रावर जाऊन उपस्थित शेतकऱ्यांना शास्त्रज्ञानी आंब्यावरील निरीक्षणे घेऊन फुलकीड, तुडतुडे, भुरी, करपा यांची ओळख करून दिली तसेच त्यांचे व्यवस्थापन विषयी विस्तृत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या शेवटी कृषि पर्यवेक्षक मालवण श्री. डि. डि. गावडे यांनी कृषि विभागाच्या अन्य योजणांची माहिती दिली. आंबा बागांमध्ये फळमाशीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषि विभागाकडून रक्षक सापळे मोफत देण्यात येणार असून त्यांचा वापर सर्व आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी करावा असे सांगितले. कृषिसेवक मालवण श्री. के. एस. कदम यांनी आभार प्रदर्शन केले.