तळेरे | प्रतिनिधी ( निकेत पावसकर ) : मराठवाड्यातील बीड व आजूबाजूच्या जिल्ह्यातून सिंधुदुर्गात ऊसतोडीसाठी आलेल्या ऊसतोड कोयता कामगारांना सामाजिक जाणिवेतून एस बी एच स्टाफ असोसिएशन वेल्फेअर ट्रस्ट मार्फत माजी जिल्हा परिषद सदस्य संजय देसाई व उद्योजिका अदिती सावंत ह्यांच्या हस्ते, कासार्डे येथे ब्लँकेट्स व स्वेटर्सचे वाटप करण्यात आले. याबद्दल ऊस कामगारांकडून आभार मानण्यात आले.
यावेळी संजय देसाई यांनी ट्रस्टच्या कामांचे कौतुक करताना, ऊसतोड कामगारांचे प्रश्न, सरकार त्यांच्यासाठी राबवित असलेल्या विविध योजना ह्यांची माहिती दिली. उद्योजिका अदिती सावंत यांनी आपल्या छोटेखानी भाषणात स्व. गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाची माहिती उपस्थितांना दिली. तसेच ऐन थंडीत ऊसतोड कामगारांना ब्लँकेट्स व स्वेटर्सचे वाटप एस बी एच स्टाफ असोसिएशन वेल्फेअर ट्रस्टने पुरस्कृत केल्याबद्दल समाजसेवक सचिन वंजारे ह्यांनी सर्व ऊसतोड कामगारांच्या वतीने ट्रस्टचे आभार मानले.
या कार्यक्रमाचे सूत्र संचालन माजी ग्रामपंचायत सदस्य अतुल सावंत यांनी केले. ह्या प्रसंगी एस बी एच स्टाफ असोसिएशन वेल्फेअर ट्रस्टचे विश्वस्त बी एस सावंत, ऊसउत्पादक शेतकरी अभिजित सावंत तसेच समाजसेवक जयेश सावंत, नंदकिशोर सावंत व अथर्व सावंत उपस्थित होते.