अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या शिवालयांकडे नेऊ पहाणारा तेजसूर्य मावळला…!
मालवण | सुयोग पंडित : महाराष्ट्र राज्यातील एक बहुआयामी व्यक्तिमत्व डाॅ. श्री.अनिल अवचट (वय 78) यांचे पुणे येथे रहात्या घरी सकाळी 09:15 वाजता निधन झाले .
लहान मुलांमध्ये रमणारा,दुरितांचे दुःख संवेदनेसकट जाणणारा समाजवादी माणुस ते एक तत्वशील लेखक,वक्ता अशी ख्याती असणार्या अनिल अवचट यांचे संपूर्ण जीवन समाजाभिमुख जीवन कार्यानेच सजलेले होते. मुक्तांगण ही महाराष्ट्रातील पहिली सकार व्यवस्थापनाची व्यसनमुक्ती संस्था उभारण्यात उभारण्यात त्यांनी त्यांच्या पत्नी डाॅ.सुनंदा अवचट यांच्या साथीने केलेले सामाजिक प्रयत्न हे आज व्यसनमुक्ती सोबतच जीवनाच्या पुनर्वसनासंदर्भातील सर्व चळवळींना प्रेरक असेच ठरतात.
त्यांचा जन्म 1944 साली पुण्याजवळील ओतूर येथे झाला होता.
लेखन व समाज कार्याच्या संदर्भात त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले होते. त्यातील ठळक असा पुरस्कार त्यांना व्यसनमुक्ती कार्यासाठी राष्ट्रपतींच्या हस्ते साल 2013 साली मिळाला .
2018 साली अमेरिकेतील मराठी फाऊंडेशनने त्यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले होते.
2017 साली त्यांना फर्ग्युसन गौरव पुरस्कार प्राप्त झाला.
बालसाहित्यासाठी त्यांना 2010 व 2014 साली मिळाला व त्यात सलग तीन वर्षे उत्कृष्ठ साहित्यिकाचा राज्य सरकारचा पुरस्कारही मिळाला हे विशेष..!
2007 साली त्यांना सातारा येथील न्या.रामशास्त्री प्रभुणे या सामाजिक न्यायाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
त्यांच्या पश्चात त्यांच्या दोन मुली अनुक्रमे मुक्ता पुणतांबेकर,यशोदा व संपूर्ण मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र असा मोठा परिवार आहे.
श्री.अनिल अवचट यांच्या निधनाने सामाजिक,साहित्यिक आणि व्यसनमुक्ती तथा पुनर्वसन क्षेत्रातील महाराष्ट्रातील सर्वोच्च योगदान आता शमल्याची भावना व्यक्त होत आहे.
डाॅ.श्री.अनिल अवचट यांच्या निर्मळ,साध्या व तरिही तेजोमय आकर्षणाच्या व्यक्तिमत्वाची भुरळ सर्वच स्तरांतील व वयोगटातील लोकांना होती.
काहीकाळ पत्रकार म्हणूनही कार्य केलेल्या डाॅ.अवचट यांच्या कला सृजनशीलतेची अनेक उदाहरणे जनमानसात प्रसिद्ध आहेत तसेच ते उत्तम बासरीवादकही होते.
आज दुपारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत.