बांदा | राकेश परब : गोवा राज्यात सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील हजारो तरुण कामानिमित्त ये-जा करतात. प्रवासादरम्यान अनेक अपघातही होतात. मडुरा दशक्रोशीतील तरुणांना याच ठिकाणी रोजगार मिळण्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातून रोजगारासाठी २५० कोटींचा प्रकल्प आणणार असल्याची ग्वाही, सावंतवाडी माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी दिली.
मडुरा एमपीएलच्या उद्घाटन प्रसंगी श्री. परब बोलत होते. व्यासपीठावर युवक काँग्रेसचे सावंतवाडी विधानसभा मतदार संघ अध्यक्ष स्वप्नील परब, मडुरा तंटामुक्त समिती अध्यक्ष बाळू गावडे, मोहन गवस, रमाकांत धुरी, प्रकाश वालावलकर, माजी उपसरपंच उदय चिंदरकर, हिरकणी महिला बचतगट अध्यक्ष तन्वी परब, प्रतिक्षा शेट्ये, सौ. मेस्त्री, अदिती धुरी, नवसो परब, शशिकांत परीट आदी मान्यवर उपस्थित होते.
गावातील हिरकणी महिला बचत गटाच्या प्रतिनिधींचा तसेच सिंधुदुर्ग जिल्हा प्रेस क्लबचा उत्कृष्ट ग्रामीण पुरस्कार प्राप्त पत्रकार विश्वनाथ नाईक, शेतीनिष्ठ पुरस्कार प्रकाश वालावलकर, मूर्ती कलाकार शशिकांत परीट, पाडलोस येथील पखवाज वादक अमेय गावडे, सोहम कोरगावकर, नितेश परीट, नवसो परब यांचा सत्कार करण्यात आला.
माजी नगराध्यक्ष श्री. परब म्हणाले की, मडुरा दशक्रोशीतील तरुणांना याच ठिकाणी रोजगार निर्माण करण्यासाठी आपण केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातून सुमारे अडीचशे कोटी रुपयांचा निधी आणणार आहे. त्यामुळे स्थानिक ४०० ते ५०० तरुणांना याच ठिकाणी रोजगार मिळणार. गावातील ७५ वर्षावरील सर्व विवाहित जोडीदाराचाही पुढील काळात सत्कार करण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन नाईक यांनी तर प्रास्ताविक तुषार धुरी यांनी केले. प्रवीण परब यांनी आभार मानले.