व्हेटर्नरी डाॅक्टर ते स्टार फार्मर असा थक्क करणारा प्रवास…!
बांदा | राकेश परब : मोपा-फकिरफाटा येथील तसेच गोवा व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवा प्रयोगशील काजू बागायतदार डॉ. दिवाकर उर्फ नितीन राजाराम मावळणकर यांना गोवा शासनाच्या कृषी विभागामार्फत देण्यात येणारा ‘स्टार फार्मर’ पुरस्कार जाहीर झाला. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते साखळी-गोवा येथे झालेल्या कार्यक्रमात हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री सावंत यांनी डॉ. मावळणकर यांचे कृषी क्षेत्रात अल्पावधीत दिलेल्या योगदानाबद्दल खास कौतुक केले.
डॉ. नितीन हे पेशाने व्हेटर्नरी डॉक्टर असून वडील राजाराम मावळणकर यांच्यापासून प्रेरणा घेऊन त्यांनी शेती क्षेत्रात काम सुरू केले. त्यांच्या वडिलांनी देखील शेती बागायतीत अनेक नवे प्रयोग करून ते यशस्वी करून दाखविले आहेत. डॉ. नितीन यांनी काजू पिकाच्या क्षेत्रात विविध प्रयोग करीत स्वतःची भरघोस उत्पन्न देणारी “एम १” ही काजूची जात विकसित केली. या जातीला देशभरातून मोठी मागणी आहे. ड्रोनद्वारे काजूवर फवारणी करण्याचा प्रयोग त्यांनी केला. बांदा व परिसरात काजू लागवडीतून आणि काजू प्रक्रिया उद्योगातून अनेक महिला व युवकांना कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध करून दिला आहे. डॉ. नितीन यांचा शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन नेहमीच सकारात्मक आणि आधुनिक राहिला आहे. सतत नवीन काहीतरी शिकण आणि त्याचे प्रयोग शेतीत करत राहणे हा त्यांचा छंद आहे. अनेक प्रयोगशील शेतकऱ्यांना भेटून ते नवनवीन प्रयोगांबद्दल चर्चा करत असतात.
काजू लागवडीबरोबरच अन्य पिकांचे देखील ते उत्पन्न घेतात. त्यांच्या या उपक्रमशीलतेची दखल गोवा शासनाने घेऊन त्यांना ‘स्टार फार्मर’ पुरस्कार दिला आहे. सावंतवाडी-दोडामार्ग फळबागायतदार संघाचे अध्यक्ष विलास सावंत, प्रयोगशील शेतकरी प्रकाश वालावलकर, उपाध्यक्ष सुरेश गावडे आणि पदाधिकारी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. पेडणे तालुक्यातील मोपा फकिरफाटा येथील असलेले मावळणकर यांनी बांदा भागात कृषी क्षेत्रात केलेल्या कार्यामुळे ते या भागात प्रसिद्ध आहेत.