चिंदर /विवेक परब : महाराष्ट्र शासन कृषि विभाग व कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या संयुक्त विद्यमाने वायंगणी येथे तालुकास्तरीय किसान गोष्टी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून कृषि विज्ञान केंद्र, किर्लोसचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. भास्कर काजरेकर यांनी उपस्थितांना भात पिकाच्या वाणांची निवड, भाताची रोपवाटीका तयार करणे व भात पिकातील एकात्मिक किड रोग व खत व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी तालुका कृषि अधिकारी, मालवण श्री विश्वनाथ गोसावी, शेतकरी सल्ला समिती अध्यक्ष श्री उदय दुखंडे, वायंगणी सरपंच श्रीम. संजना रेडकर, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक श्री निलेश गोसावी, कृषि सहाय्यक श्री सुनिल कदम, श्री अश्विन कुरकुटे, श्री सुशिलकुमार शिंदे, ग्रामसेवक श्रीम. रावले आदी उपस्थित होते. मालवण तालुक्यातील वायंगणी या गावाच्या देवमळयात दरवर्षी साधारण अडीचशे एकर एवढ्या क्षेत्रावर उन्हाळी भात शेती करण्यात येते. गावातील सुमारे साडेतीनशे कुटुंबातील प्रत्येकाच्या मालकीचा एकतरी कुणगा या देवमळयात आहे. या गावातील लोकं पिढयानपिढया शेतीसाठी एकत्र येऊन कोणतेही वाद, तंटे न करता या देवमळयात शेती करतात. अडीचशे एकराचे हे भलेमोठे शेती क्षेत्र ओलिताखाली आणण्यासाठी पाण्याचे जे पाट तयार केले आहेत, त्यांच तंत्रज्ञान व नियोजन हे आधुनिक तंत्रज्ञानालाही लाजवणारे आहे. तब्बल 300 वर्षाची परंपरा असलेल्या या सिंचन पध्दतीतील पाटांची अशी रचना केली आहे की, या भल्यामोठया क्षेत्रातील कुठल्याही कुणग्याला भिजविण्यासाठी शेती पंपाची आवश्यकता भासत नाही. या शेतीतून जाणारा बारमाही पाण्याचा पाट हे ग्रामदेवतेने या गावाला दिलेले वरदान समजले जाते. असे प्रतिपादन यावेळी श्री उदय दुखंडे यांनी कले. यावेळी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार कृषि सहाय्यक श्री सुशिलकुमार शिंदे यांनी मानले.
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -