(संपूर्ण काल्पनिक)
भाग तिसरा : अंतिम सत्य……..!
लेखक : सुयोग पंडित
लेखक सुनिल सरमळकर आता थरथरत्या शरीराला एका खुर्चीवर बसवू पहात होते. वडिलांना प्रथमच इतक्या आगतिक अवस्थेत पहाणारी मुलगी व अभिनेत्री निर्मिती सोफ्यावरुन उठून त्यांच्या मदतीला धावली.राज्यपाल विजय परब आणि त्यांच्या पत्नीने एकाचवेळी एक वाक्य उच्चारले,” भोग….भोग आहेत हे तुझे…!” खुर्चीवर बसताच थोडा आधार गवसल्यासारख्या चेहर्याने आणि
आता थोड्या उपहासात्मक हास्याने सुनील सरमळकर म्हणाले,” चोव्वीस वर्षे भोगतोय…! अजून तुम्हाला मी काहीच सांगितले नाही आहे.भोग आहे की काय ते माझ्या थरथरत्या शरिरावरुन नको ठरवूस विजू…..ओह…साॅरी ,गव्हर्नर परबसाहेब…! आता एकही शब्द न बोलता थंड डोक्याने आणि पूर्वग्रह न बाळगता ऐकून घ्या…!”
आता राज्यपाल विजय परबांचा मुलगा चिन्मय प्रथमच अतीत्रस्त झाला. त्याने उठून सुनिल सरमळकरांसमोर येत म्हणले,” हे बघा….खूप झाला ड्रामा. हा तुमचा लघुपट,चित्रपट किंवा शायरीचा मंच नाही की जिथे तुम्हाला उत्सुकता ताणल्याबद्दल वाहव्वा मिळेल…! थेट मुद्द्यावर या. मगाशी मी माझ्या डॅडच्या हातची बंदूक काढून घेतलेली पण आता तुम्हीच तुमची सुपारी आधीच घेतलीय हे ध्यानात घ्या आणि बोला पटापट….!”
निर्मितीने चिन्मयकडे एक तुच्छ कटाक्ष टाकला. पण मनातून तीही तिच्या वडिलांची म्हणजे ज्यांना ती “काकल्या” म्हणायची त्यांच्या संपूर्ण संभाषणाला आतुर होतीच. राज्यपालांची पत्नी अवंती हात जोडून सुनील सरमळकरांना सांगत होती ,” बोला…बोला..सांगा….सगळं सांगा……मी मरेन ओ नाहीतर…!”
” विजू, तू त्यादिवशी पोलिस तपास आणि शोधाशोध थांबवायचे आदेश देऊन निघून गेलास. पत्रकार,गांववाले सगळेच तिथून पांगले. रात्री उशिरा मी आणि माझी पत्नी एकमेकांचे सांत्वन करत करत घरी यायला वाडीकडे निघालो.
घरी पोहचायच्या आधीच वरच्या घाटीतून पाहिले की आमचे झोपडे जाळण्यात आलेले होते.घरासमोरील अंगणात पेटलेल्या झोपड्याच्या उजेडात माझ्या दोन गुरांनाही अतिशय अमानुषपणे दाव्याला बांधून चाबकाने फोडत असल्याचे आम्ही दोघांनी पाहिले. जवळपास सत्तर ते ऐंशीजण तेंव्हा आमची वाट पहात होते. सगळे ओळखीचेच होते आणि सगळेच वाडीतलेदेखिल होते.
‘ वाडीच्या नांवाला कलंक लावला’ असा माझ्यावर आरोप करत करत ते माझ्या दोन्ही बैलांना चाबकावत होते.
मी आधीच निर्मितीच्या गायब होण्याने हबकलेला,थकलेला व संपलेला होतो. माझी पन्नाशी पार झालेली होतीच पण माझ्या पत्नीची पन्नाशी जवळ येत होती तीही तिच्यासोबत अनेक व्याधींना घेत …!
मी ठरवलं…माझे काहीही होवो परंतु माझ्या पत्नीला मी असा बैलांसारखा मार नाही खायला लावणार…!
अभिनेत्री निर्मिती अवाक् होऊन सगळं ऐकत होती. चिन्मयलाही आता हे सगळं काहीतरी खोल व गहन आहे याची जाणीव होत होती. अवंती परब यांचे कान व डोळे फक्त सुनील सरमळकर नामक दृकश्राव्य माध्यमाकडे लागले होते आणि महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल विजय परब त्यांचा चष्मा सावरत पण आता थोड्या धीरोदत्तपणे सुनील सरमळकरांना ऐकत व पहात होते.
” विजू, तू तपास थांबवण्याचा आदेश दिलेला होतासच..म्हणून पोलिस बंदोबस्तही नव्हता. मी आणि माझी पत्नी पोलिसांत जाऊन संरक्षण मागायच्या पात्रतेचे असणारच नव्हतो.
मी थेट ओटवण्याच्या नदीला पुन्हा पार करुन बांद्याच्या बाजुला न येता सावंतवाडीतील चर्हाट्यामार्गे बाहेर पडायचे ठरवले. माझ्या बायकोची अवस्था आणि ताकदही नव्हती पण…पण मला तिचा जीव प्यारा होता. मी कशीबशी तिला रात्रभर पायपीट करवत करवत चर्हाट्यापर्यंत आणली.पुढे न्यू खासकीलवाडा आणि हायवे….असे गणित होते माझे.
पण दमलेला मी,संपत चाललेली बायकोची ऊर्जा आणि मध्ये चिखल व दलदलीचा चर…!
न्यू खासकीलवाड्यानंतरचा चर पार करण्यात एक धोका होता की पलिकडेच सावंतवाडी जेलसुद्धा होती. अगदी हायवेलाच…!
म्हणून मी तो बेत रद्द केला आणि महादेव भाटलेच्या चिंचोळ्या गल्लीतून अंदाज बांधत बांधत सावंतवाडी जिमखान्याच्या दिशेने निघालो. वाटेतच एका घरासमोर एक सायकल दिसली. बरे वाईट वगैरेचा विचार न करता दगडाने त्या सायकलचे कुलुप तोडले…होय..मी तोडले…! बायकोला समोर बसवली आणि कसाबसा जिमखान्यापर्यंत पोहोचलो.
मी चोरी केली….सायकल…! माझा पहिला गुन्हा होता तो…आयुष्यातला विजू….आयुष्यातला.
मी नाय रे निर्मितीला चोरली…..!”
आता सुनील सरमळकरांना रडू अनावर झालेले. दोन मिनिटे रडून झाल्यावर त्यांनी पुढील कथन सुरु केले.
” पहाट संपून दिवस सुरु होत होता. माझ्यासमोर तीन मार्ग होते. एकतर हायवेला येऊन मुंबई किंवा गोवा , आंबोलीमार्गे कोल्हापूर…बेळगांव…नाहीतर बायकोसकट स्वतःला संपवणे कारण समाजात आता जगायची पात्रताच नव्हती. घरही जळालेले होते. परत पाठी फिरलो तर वाडीवालेसुद्धा जाळूनच टाकणार होते.
खिशात तूच दिलेल्या पगाराचे तीन महिन्यांचे मिळून बाराशे रुपये होते…लाखमोलाचे होते..!
आम्ही तोंड लपवत लपवत सावंतवाडी स्टॅन्डवर पोहचलो.एक कदंबा गाडी लागलेली होती. तीनचार प्रवासी आधीच त्या बसमध्ये होते…आम्हीही घुसलो.
कंडक्टरला तिकिटाचे सोळा रुपये दिले आणि मान खाली घातली ती थेट गोव्यातील शेवटचा स्टाॅप वास्को आल्यानंतरच वर काढली.
एकदा सावंतवाडी आणि महाराष्ट्र पार करायचा होता….तो टप्पा जवळपास अठरा तासात पार पडला…!”
गोव्याच्या राज्यपाल सदनात आता प्रत्येक क्षण एक युग भासत होता. वर्तमानातील आणि सुनील सरमळकरांच्या भूतकाळातीलही..!
तितक्यात दोन डाॅक्टर्स व एक नर्स मध्येच येऊन महाराष्ट्र राज्यपाल विजय परब व त्यांच्या पत्नीची तपासणी वजा विचारपूस करून गेले. “सर्वांसाठी काॅफी पाठवा जरा….”, असा विजय परबांनी आदेश दिला.
आणि वर एक उपआदेश दिला ,” सर्व म्हणजे चार कप…फक्त परब कुटुंबियांच्यांसाठी…मी,पत्नी व माझी दोन्ही अपत्ये!”
“ओह्ह …डॅड…नाॅनसेन्स..! ही तुमची मुलगी कुठून? त्यांची कथा पूर्णपणे ऐका तरी…आणि हो…त्यांनाही काॅफी पाठवायला सांगा.ऑन ह्युमॅनिटी बेसीस एटलिस्ट….!” चिन्मय परब चरफडत होता.
विजय परबांनी तिथल्या कर्मचार्याला “पाच…पाच कप पाठवा!” असे सांगताच सुनिल सरमळकर यांनी चिन्मयकडे पाहून हात जोडले.
काॅफीब्रेक झाल्यावर सुनिल सरमळकर यांनी पुन्हा त्यांचे कथन सुरु केले.
“खूप भटकलो विजू..दोन दिवस. खिशात हजारभर होते म्हणून रहा जेवायचे वांदे नव्हते. पण तो पैसाही संपणार हे कळत होते म्हणून दोघांसाठी एकत्र रहाता येईल अशी नोकरी शोधत होतो…
शेवटी मिळाली नोकरी पण ती ‘बायना’ येथे…! बायना म्हणजे एकेकाळची गोव्याची बदनाम वेश्याकाॅलनी..! पण मन मारलं आणि तिथल्याच एका घाणेरड्या लाॅजवर जेवण बनवणे आणि साफसफाई साठी आम्ही दोन खचलेले म्हातारा म्हातारी राहू लागलो.
मनातून आणि डोळ्यासमोरून निर्मितीचा चेहरा आणि कानांतून तिची “काकल्या” अशी हाक एकही क्षण जात नव्हती.
नोकरी सुरु झाली तसतसा पैसाही गाठीशी येऊ लागला. परतीचे दोर तर कापले गेलेलेच होते…त्यामुळे आता जबाबदारी अशी फक्त आम्हीच दोघे होतो..एकमेकांची!
दोन महिन्यांनी बायकोला चक्कर आली म्हणून डॉक्टरकडे नेले तर टक्कर यायचे एक आश्चर्यकारक कारण समोर आले… आणि खरे सांगतो विजू….अवंती वहिनी तूही ऐक…”माझी बायको गरोदर होती….!”
‘वयाची पन्नाशी गाठलेली स्त्री कशीकाय गरोदर राहू शकते…!’ या माझ्या,बायकोच्यासकट डाॅक्टर्सचे उद्गार होते.
पुन्हा तपासणी केली आणि गरोदरपणाची पक्की खात्री पटली.
बायकोला घेऊन लाॅजच्या मालकाकडे गेलो..त्याने सरळ नोकरी सोडायला सांगितली कारण बायना ही वस्ती फक्त नरकातले स्वर्गसुख देऊ शकणारी होती…एखाद्या नवजीवाला जीवन वगैरे नाही. आणि त्यातकरुन मुलगी वगैरे झाली तर जागेवरच ऍडव्हान्स बुकींगवाले नराधमही तिथे उपलब्ध होते.
लाॅजच्या मालकाने ठरलेला पगार आणि वर दोन हजार रूपये देऊन एक खासगी गाडी करुन देत आम्हाला कारवारला जायला सांगितले.तिथे वातावरण सात्विक आणि महत्वाचे म्हणजे निर्धोक जीवन जगायची शाश्वती होती असे लाॅज मालकाचे म्हणणे होते विजू.
तसेच झाले. कारवारला गेलो…मला तिथे एका मंदिराच्या मराठी ग्रंथालयात शिपायाची नोकरी मिळाली. छान व प्रशस्त अंगण असणारे घर मिळाले.
बायकोचे बाळंतपण उत्तमपणे पार पडले. पुढे महिन्याभरांतच ती मात्र अचानक गेली…!
जाता जाता आमच्या मुलीचे नांव कानात सांगून गेली,” निर्मिती विजय अवंती परब”…..होय..! तिचेच वाक्य.
माझ्या निर्मितीवरील अती लळ्यामुळे मी तिला मनोमन चोरली होती असा माझ्या बायकोचा माझ्यावर आरोप होता.
बारा महिन्यात ती जितके बोलली नाही ते ती जाता जाता दोन तासात बडबडून गेली.
माझ्या बायकोचाही विश्वास नव्हता माझ्यावर…तिलाही वाटत होते की प्रेमापायी मी लहानग्या निर्मितीला बुडवून मारली किंवा आणखी कोणालाच नको म्हणून प्रवाहात सोडून दिली.
देवाने प्रायश्चित्त म्हणून उतरत्या वयात मातृत्वाचे दान देऊन त्या शल्यातून मोकळे व्हायची तिला दिशा दिली होती असे तिचे म्हणणे होते.
या निर्मितीला घेऊन ती तुमच्याकडे येणार होती पण बोलता बोलता तासाभरातच ती देवाकडे निघून गेली.
माझे जग संपत चालले होते.
मला तिने या निर्मितीला तुमच्या हवाली करायची शपथ दिली होती पण मी ती टाळत राहीलो कारण माझे जगात यायचे कारणच हिसकावले जाईल ही भीती होती..
तीच माझी दुसरी आणि अंतिम चूक रे विजू…..तीच…!”
” आत्तापर्यंत सांगीतलेली कथा ही भाकडकथा वाटत असेल तर थांब…!” सुनील सरमळकरांनी त्यांची शबनम पिशवी उघडली. त्यातून एक फाइल बाहेर काढत ते विजय परबांसमोर धरत म्हणाले ,” गव्हर्नर सर….प्लीज गो थ्रू दिज डाॅक्युमेंटस्…ऑल आर ओरिजिनल. राईट फ्राॅम द टिकटस् ऑफ कदंबा बस टू द पासेस ऑफ गोवा फिल्म फेस्टीवल.
चोव्विस वर्षांचा अधिकृत लेखाजोखा.
निर्मितीला जन्म दिलेले डाॅक्टर,दवाखाना,तिच्या शाळा,तिचे उच्चशिक्षण,तिचा व माझा पासपोर्ट,तिची बक्षिसे,तिची कमाई,माझी कमाई……सगळ्या सगळ्याची छाननी करा.
मी मनाने तुमचे लेकरू चोरले की नाही हे मीही नाही जाणत विजू व अवंती वहिनी परंतु मी त्या नदीखाली पाण्यात पंधरा सेकंद रहायचा गलथानपणा नक्कीच केला.
त्याची भरपाई म्हणा किंवा भोग म्हणा….गेली चोव्विस वर्षे मी निर्मितीक्षम व निर्मितीसंग आहे.
पुढे मी छोटी छोटी नाटके लिहिली..प्रसिद्धी मिळाली. निर्म्मि्मि निर्मितीला अभिनयाचा ध्यास लागला.
तुम्हाला भेटायचे खूप मानसीक प्रयत्न केले परंतु भीती होती की हीच ती तुमची व माझी बाबू निर्मिती असा ग्रह करून तुम्ही मला कायमचे आत टाकाल…नाहितर गोळ्या घालाल.
आज भीती संपलीय…कारण निर्मातीला तिची तिची ओळख आहे….काहिच सिद्ध करायचे नाहीय…!”
विजय परबांसकट हाॅलमधील सगळेच स्तब्ध होते..!
कोणितरी काहीतरी बोलायच्या आतच सुनील सरमळकरांनी विजेच्या तडफेने एका सुरक्षारक्षकाकडचे पिस्तुल हिसकावून घेत स्वतःच्या कपाळावर लावले आणि म्हणले,” निर्मिती बाबू….मला माफ कर. तुझा काकल्या तुला आजपर्यंत खूप ऐषोआराम देऊ शकला नाही…पण या तुझ्या काकल्याचे तुझ्यावर प्रेम अमर आहे…! निघतो आता…गेली चोव्वीस वर्षे तुझी आई अधांतरात माझी वाट पहात बसली आहे….तिला घेऊन एक शेवटची घाटी पार पाडायची आहे…..बघुया स्वर्ग मिळतोय की तिथेही चाबकाचे फटकेच….!”
रक्ताच्या थारोळ्यातला सुनील सरमळकरांचा देह….सगळं पाहून थबकलेले राज्यपाल विजय परब कुटुंबिय,धावाधाव करणारे सुरक्षारक्षक आणि सुनिल सरमळकरांना मिठी मारत आजची आघाडीची अभिनेत्री निर्मिती टाहो फोडत म्हणत होती,” काकल्या…..अरे का केलंस असं? मी तुझ्याशिवाय कशी जगेन….? काकल्या उठ ना…उठ ना….काकल्या…!”
समाप्त