शिक्षक भारतीची सिंधुदुर्ग डाएटकडे होती मागणी
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : आजपासून कुडाळ तालुक्यात ऑफलाईन पद्धतीने प्रशिक्षणे घेत असल्याची बाब महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती सिंधुदुर्गच्या वतीने डाएट प्राचार्य सिंधुदुर्ग श्रीमती ए. पी. तावशिकर यांच्या निदर्शनास आणून दिली असता सदर प्रशिक्षण शिबिर रद्द करण्याचे निर्देश त्यांनी संबंधितांना दिले.
सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने जिल्ह्यातील शाळा बंद केल्या आहेत तसेच शिक्षकांना ऑनलाईन पद्धतीने व गृहभेटीद्वारे शिक्षण देण्याच्या सूचना आहेत. सध्या सुरू असलेल्या ऑफलाईन प्रशिक्षणास उपस्थित राहून उद्यापासून शिक्षक गृहभेटीद्वारे विद्यार्थ्यांच्या संपर्कात जाणार आहेत.शिक्षकांना एकत्र बोलावून प्रशिक्षणे घेतल्यामुळे कोविड प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच मोठ्या जमावबंदी चे आदेश जिल्ह्यात लागू आहेत त्यामुळे प्रशिक्षणे रद्द करावीत अशी मागणी शिक्षक भारती मार्फत करण्यात आली त्यावर डायट प्राचार्य यांनी गटशिक्षणाधिकारी,कुडाळ व गट साधन केंद्र,कुडाळ यांच्याशी तात्काळ फोनवर संपर्क करून अश्या प्रकारची आजची ऑफलाईन प्रशिक्षणे तात्काळ रद्द करून ऑनलाईन पद्धतीने यापुढे घ्यावी असे आदेश दिले. त्यानुसार कार्यवाही करण्याच्या सक्त लेखी सूचना दिलेल्या आहेत. यावेळी मा. जिल्हाध्यक्ष मा.संतोष पाताडे , श्री. मंगेश बागवे(जिल्हा प्रतिनिधी, कुडाळ),श्री. लहू पाटील (जिल्हा प्रतिनिधी)व विनेश जाधव(कोषाध्यक्ष,मालवण ) हे उपस्थित होते.