शिरगांव/संतोष साळसकर : असंख्य माहेरवाशिणींच्या हाकेला धावून येणारी आणि भाविकांच्या नवसाला पावणारी अशी ख्याती असलेल्या देवगड तालुक्यातील शिरगांवचे अतिशय जागृत ग्रामदैवत श्री पावणाई देवीचा सात प्रहरांचा अखंड हरिनाम सप्ताह रवि. दि.१३ जाने. रोजी आयोजित करण्यात आला आहे.यावेळी कोरोनासंबंधी शासनाचे सर्व नियम पाळून हा उत्सव पारंपरिक रितिरिवाजाप्रमाणे भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात येणार आहे.
या देवालयात दरवर्षी पौष महिन्याच्या पुत्रदा एकादशी दिवशी अतिशय थाटामाटात आणि भक्तिमय वातावरणात हरिनाम सप्ताह साजरा करण्यात येतो.या उत्सवाला जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून,मुंबईहून चाकरमानी तसेच माहेरवाशिणी देवीच्या दर्शनासाठी,नवस बोलण्यासाठी तसेच पावलेले नवस फेडण्यासाठी भक्तिभावाने येतात.यावेळी शिरगांव पंचक्रीशीतील,गावातील महिला बचत गटांची छोटेखानी दुकाने,जिल्ह्यातील व जिल्हाबाहेरील तसेच गावातील व्यापारी यांचीही विविध खाद्यपदार्थांची,खेळण्यांची दुकाने थाटतात.तसेच गावातील भजने,दशक्रोशीतील भजनीमेळे,रंगीत दिंड्या यांनी हा परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघतो.मंदिराला आणि परिसराला आकर्षक विद्युतरोषणाई केली जाते.यावर्षी कोरोनाचे संकट असल्यामुळे हा उत्सव कोरोनाचे सर्व शासकीय नियमांचे पालन करून साजरा करण्यात येणार असून या हरिनाम सप्ताहाला भाविकांनी उपस्थित राहुन दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री पावणादेवी देवालय विश्वस्त मंडळ,बारापाच मानकरी,ग्रामस्थ यांनी केले आहे.