(संपूर्ण काल्पनिक)
लेखक: सुयोग पंडित.
श्री. विजय परब हे नांव अतिशय कमी वयामध्ये जिल्हाधिकारी म्हणून ऐंशीच्या दशकांत महाराष्ट्र राज्यात आदराने घेतले जाऊ लागले होते. अवघ्या तिशीमध्ये संपूर्ण शिक्षण स्वतःच शिष्यवृत्तीवर पूर्ण करुन एक जबाबदार व तडफदार आय.ए.एस. अधिकारी म्हणून त्यांचे त्यांच्या मूळ सिंधुदुर्ग जिल्ह्यात व खासकरुन सावंतवाडीतील मूळगांव बांदा येथे कौतुक होतेच आणि आता ते सिंधुदुर्ग जिल्ह्यालाच जिल्हाधिकारी म्हणून लाभल्याने सर्वांना आनंद होता. विजय परब यांना त्यांच्या गांवची ओढ नेहमीच होती परंतु स्वतःच्या शैक्षणिक व्यस्ततेमुळे स्वतःचा गांव,तालुका किंवा जिल्हा त्यांना मुक्तपणे अनुभवता आला नव्हता ही खंत होती. आता ती खंत कमी झाली कारण आपल्याच जिल्ह्यात काम करता करता त्यांना जिल्ह्यातील सामाजिक, नैसर्गिक, सांस्कृतिक आणि माणसांचाही मजेत अनुभव व अभ्यास मिळणार होता.
आईवडिलांनी तर त्यांना जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाल्यावर दोनच महिन्यांत विवाहाच्या बोहल्यावरही चढवले व पुढे वर्षभरातच त्यांना एक ‘निर्मिती’ नावाची मुलगीही झाली. विजय यांची पत्नी अवंती सुशिक्षित होती परंतु नवर्याच्या नोकरीच्या व्यापासमोर तिने स्वतःची प्राध्यापक म्हणून कार्य थांबविले…परंतु त्यात त्याग वगैरेपेक्षा विजय यांच्या आईवडिलांची काळजी हे तिने आद्यकर्तव्य मानले होते.
निर्मिती वर्षभराची झाली आणि एका मोटार अपघातात विजय यांच्या आईवडिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
विजय आय ए एस असल्याने
थोडे सावरल्यासारखे दाखवत होते परंतु अवंती मात्र सासुसासर्यांच्या जाण्याने खचली होती.
एकेसायंकाळी विजय अवंतीला घेऊन सावंतवाडी जवळील ओटवणे या गावातील नदीकिनारी घेऊन गेले.
ओटवणे नदी व तो परिसर हा विजय परबांचा अतिशय आवडता व हवाहवासा असा परिसर होताच कारण अगदी लहानपणापासून ते त्या किनार्यावर दोस्त व सवंगड्यांसोबत पोहले व बागडलेले होते.
त्यांनी अवंतीला शांतपणे समजावत म्हणले,”तुझे सासुसासरे माझे आईवडीलच होते ना गं..? पण आज आपल्या कर्तव्यांसमोर जगताना मी एकही अश्रू ढाळत नाही. पण तू तुझे कर्तव्य हसत हसत पार पाडत नाहीयस असेच मला वाटते..!”
अवंतीला आश्चर्य वाटत तिने विचारले,” माझे कर्तव्य..? कोणते..? मी कुठली नोकरी करतेय तुमच्यासारखी?”
विजय मंदपणे हसले व म्हणले,” आईपणाचे कर्तव्य. गेले महिनाभर तुझे सासुसासरे गेल्यापासून तू फक्त एक स्वयंचलित यंत्र बनून तिच्याशी बोलतेयस असे मला वाटते. आता निर्मिती एक वर्षांची झालीय. तिला आता तुझ्यातील हसरी आई दिसली तरच तिला आपली आजी व आजोबा खरेच चांगले होते असे वाटेल..खरंय ना..?”
अवंतीला विजयची गोष्ट पटली व तिने पुन्हा आनंदी बनायचे वचन स्वतःसोबतच विजय परबांना दिले.
पुढील वर्षभरातच विजय परबना दुसरे अपत्य झाले ते मुलाच्या रुपात.!
चिन्मय असे त्याचे नामकरणही झाले.
चिन्मयचा सांभाळ करताना अवंतीकडे दुर्लक्ष होऊ नये असे विजयना वाटले म्हणून त्यांनी त्यांचाच एक शालेय वर्गमित्र परंतु पुढे जास्त शिकू न शकल्या सुनिल सरमरळकरची अधिकृत मदतनीस म्हणून नियुक्ती केली.
सुनिल हा विजय परबांचा लहानपणापासून मित्र असला तरीही तो प्रचंड कर्तव्यदक्ष माणुस व एक कवी म्हणूनही प्रसिद्ध होता.त्याचे कवीपणच त्याला जीवनात त्याचे गांव म्हणजे ओटवणे यांपासून दूर ठेवू शकत नव्हते. हे ओटवणे तेच गांव होते जिथे विजय ,सुनिल व इतर मित्र मौजमस्ती करत मासे पकडणे वगैरे बालउद्योग करत होते.
सुनिल सरमळकर जरी बालपणचे मित्र असले तरिही विजयसाठी जवळपास वीस वर्षांनी मोठे होते. पण एक स्वच्छंदी माणुस जो जीवनभर सर्वांचाच चांगला मित्र असतो तसेच काहीसे सुनीलचे व्यक्तिमत्त्व होते.सुनिलच्या विवाहाला वीस वर्षे उलटली होती परंतु त्यांना मुलबाळ नव्हते. सुनिल कधी त्या दुःखात कधीच अडकले नव्हते कारण जगातील प्रत्येक लहान मूल त्यांचे मूल बनून जगायचे..! आणि आतातर जिल्हाधिकारी विजय परब यांच्या छोट्या निर्मितीची जबाबदारी थेट त्यांना लाभत होती म्हणून ते मनापासून आनंदी होते.
निर्मिती कंटाळल्यासारखी झाली की सुनिल विजयची परवानगी घेऊन निर्मितीला ओटवणे गांवात फिरवून आणायचे. छोटी निर्मिती विजयला “काकल्या” अशी लाडाने हाक मारायची. ते “काकल्या” असे शब्द ऐकणे ही गोष्ट सुनिलसाठी जगातील सर्वात मोठ्या पगाराहून मोठी होती.
ओटवणे नदीकिनारची निसर्ग संपदा, लहान मोठ्या झाडाझुडुपांची नांवे,सावरीचा वृक्ष वगैरे आता निर्मितीला तोंडपाठ झालेले होते.
मग दमून भागून सुनिल तिला तिच्या घरी “कोराचहा” प्यायला व सोबत बटर खायला न्यायचे तो आनंद निर्मितीलाही कुठल्याही पंचतारांकित हॉटेलपेक्षा मोठ्ठा असायचा.
सुनिल,सुनीलची पत्नी आणि निर्मिती ही एक वेगळीच आणि कागदावर न आखलेली कुटुंब प्रणाली बनत होती.
विजय परब व अवंतीलाही त्यांना पाहून मजा येत होती. सोबत चिन्मयही पाच महिन्यांचा होत आलेलाच..!
जिल्हाधिकारी म्हणून विजय परबांचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कामाचे व्याप आता वाढत चालले होते. कर्तव्यदक्ष व कार्यतत्पर प्रतिमा जपताना त्यांनी,” आता लेकीला परवानगी वगैरेशिवायही फिरायला घेऊन जात जा..”,अशी प्रेमळ तंबीही दिली.
आता सुनिल सरमळकर आणि निर्मिती ही लहानमोठी जोडी जवळपास रोजच ओटवण्यात फेरी मारून येऊ लागली होती…!
सायंकाळ छान जाते,मुलीचा व्यायामही होतोय व सुनिलही खूश आहे हे पाहून विजय व अवंती आनंदी होते…..
” काकल्या….मला ते फूल हवंच आहे आता..काहीही करुन..! हवं म्हणजे हवंच नाहीतर मी तुझ्याशी कधीच बोलणार नाही..”, असा निर्मितीचा सूर ऐकून सुनिल काळजीत पडला. कारण आजपर्यंत जवळपास चार महिने तो रोज तिला फिरायला जरुर आणायचा पण तिला एकटं टाकून त्यांनी कधीच नजरेआड होऊ दिली नव्हती.
ओटवण्याची नदी जरी वरवर सुंदर,आकर्षक असली तरिही त्यातील प्रवाह भल्याभल्यांना वाहवून नेईल अशाच ख्यातीचा !
निर्मितीला जे फूल हवं होतं ते नदीच्या पल्याड होतं. सुनिल अनेक हजारदा ती नदी पोहून गेलेले होते व त्यांना स्वतःच्या जीवाची काळजी नव्हती पण पल्याड जाऊन येईपर्यंत कमीतकमी पाच मिनिटे लागणार होती. ती पाच मिनिटे निर्मितीला धोक्याची जाऊ नयेत .हीच त्यांची इच्छा होती.
बालहट्ट….व तोही जीवनात सर्वोच्च खुशी दिलेल्या निर्मितीचा मोडवणे कवी मनाच्या सुनिल सरमळकरांना पटत नव्हतं. किनार्यावरही नेमके कोणीच दिसत नव्हते..जेणेकरून निर्मितीचा हात घट्ट पकडून तिला उभं ठेवता येईल. निर्मितीला शंभरदा सूचना देऊन सुनिलनी त्यांचा शर्ट काढला आणि निर्मितीकडे पाहून म्हणाले,” हलायचं नाही हा बेटा इथून…लगेच येतोय..तुझ्यासमोरच आहे बघ मी!”
अडिच वर्षांची निर्मितीही मिश्किलपणे सुनिलला पाहून म्हणाली,” काकल्या कशी काय हलेन..? तू आईला माझं नांव सांगशील ना ..हललेतर?”
आता सुनिलची खात्री पटली आणि त्यांनी पाण्यात सूर लावला. पण बॅकस्ट्रोक पद्धतीनेच म्हणजे पाठीवर पोहत पोहत त्यांनी पलिकडचा किनारा गाठायला सुरवात केली. निर्मितीवर त्यांचे संपूर्ण लक्ष होते.
निर्मितीही त्या फुलाला हातात घ्यायच्या अप्रूपाने टाळ्या वाजवत होती. अर्धी नदी पार झाल्यावर सुनिलला नाईलाजाने सरळ पोहावे लागत होते..कारण ओटवणे नदीचा प्रवाह जोर धरू लागला होता.
पलिकडच्या किनार्यावर पोचताच त्यांनी त्या निर्मितीच्या दोन फुलांना पटकन खुडलं आणि पुन्हा नदीत सूर मारला. झपाझप अंतर पार व्हावं म्हणून त्यांनी पाण्याखालून म्हणजे अंडरवाॅटर जायचं ठरवलं.
दोन्ही फुलं व्यवस्थित राखत अंडरवाॅटर यायचं सोपं नव्हतं पण ते काम निर्मितीसाठी सुनिल सरमळकर यांना अशक्य नव्हतं…कारण तो बालहट्ट होता…एक गोड व सर्वोच्च बालहट्ट..!
नदीकिनार्यावर येताच सुनिल सटपटले.
‘निर्मिती कुठेच दिसत नव्हती…!’
इन्स्पेक्टर झुंजार चोडणेकर यांनी जिल्ह्यातील फौज निर्मितीच्या शोधासाठी कसली होती. जिल्ह्याबाहेरुन पाणबुडे मागवले, गावातील तज्ञ पोहणार्यांना पाचारण केले आणि शेवटी नाईलाजाने ते जिल्हाधिकारी विजय परबांसमोर येत म्हणाले,” माफ करा सर…..आता या सुनिल सरमळकरला आत घेऊन व थर्डडिग्री लावूनच मी सगळं वंदवून घेणार..!”
विजय व अवंतीला काय करावे सुचत नव्हते. सुनिलच्या पत्नीचीही महिला पोलिसांनी चौकशी केली. ती पन्नाशीचीच होती ….सुनिलही जवळपास तेवढाच म्हणून त्यांची तब्येत लक्षात घेत विजयनी थर्डडिग्री वगैरे न द्यायची ताकिद दिली.
फक्त ते व अवंती सुनिल व त्याच्या पत्नीसमोर जात म्हणाले,” आम्ही हात जोडतो….काही घातपात नाही ना..? खरं सांगा. परराज्यात मुलं पळवायच्या टोळीचे अमिष वगैरे तुम्हाला नाही ना..?”
सुनीलने विजयसमोर हात जोडत म्हणले,” विजय…तू मला तुझ्या लहानपणापासून ओळखतोस…व मी असलं काही करेन का…?”
विजयला काय बोलावे सुचत नव्हते.
शेवटी त्यांनी इन्स्पेक्टर झुंजार चोडणेकर यांना ‘अपघाती मृत्यू’ नोंद करायचा आदेश दिला.
विजय परब व त्यांची पत्नी अवंती त्यांच्या मोटारीत बसता बसता म्हणले,” आजपासून सुनिल सरमळकर हा कुठल्याच कामावर नसेल व मला हा व याची पत्नी माझ्या कुटुंबाच्या आसपासही दिसले तर मी कुठलीही भयंकर कडक कारवाई करेन…यांच्यावर व …तुम्हा सर्वांवर..!”
घटना स्थळावरून पोलिस प्रशासनाची मंडळी, पत्रकार व एकेक गांववाले आता पांगू लागले.
सुनिल मटकन् खाली बसून त्याच्या पत्नीला म्हणला, ” काकल्या…ती सलग अशी म्हणत होतीच..फक्त काहीक्षण मी पाण्याखाली गेलेलो गं…फक्त काहीक्षण..!”
दोघेही धायमोकलून रडू लागले.
मावळणार्या सूर्याखालील ओटवण्याच्या नदीलाही रडू येईल इतक्या आवेगात सुनिल सरमळकर आक्रोश करुन म्हणत होते, ” निर्मितीबेटा…..मी सांगितलेलं ना ..की हलू नकोस! तू म्हणलेलीस की होय रे काकल्या… काय केलेस ग…? माझ्यावर रागावलीस?
बेटा कुठे गेलीयस काकल्याला सोडून…?…का गेलीयस……आता कसा जगेल काकल्या तुझ्याशिवाय.!”
रातकिड्यांचा आवाज आता वाढू लागला…सुनिल सरमळकरांची शुद्धही आता हळूहळू हरपू लागली…!
(क्रमशः)
(कथेचा पुढील भाग उद्या दिनांक 08 जानेवारी.)
#आपली_सिंधुनगरी_चॅनेल