मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : ओझर विद्या मंदिर कांदळगाव प्रशालेच्या खुल्या मैदानामध्ये नुकताच विद्यार्थी व शिक्षकांसाठी मालवण येथील खगोल तज्ज्ञ मंदार माईणकर यांच्या मार्गदर्शनाखाली दुर्बिणीद्वारे आकाश दर्शनाचा कार्यक्रम संपन्न झाला. निरभ्र आकाश, मंदार माईणकर यांचे खगोल शास्त्राविषयीचे सखोल ज्ञान, विद्यार्थ्यांची उत्सुकता आणि पालकांचे सहकार्य यामुळे हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.
मंदार माईणकर यांनी सुरुवातीला विद्यार्थ्यांना पीपीटी द्वारे अवकाशातील ग्रह व तारे, आकाशगंगा, धूमकेतू याबद्दल शास्त्रीय माहिती दिली. विद्यार्थी आणि शिक्षकांशी प्रत्यक्ष संवादाद्वारे अवकाशस्थ ग्रहताऱ्यांविषयीच्या शंकाकुशंकांचे निरसन केले. त्यानंतर प्रत्यक्ष दुर्बिणीद्वारे आकाशातील ग्रह-ताऱ्यांचे दर्शन घडवून आणले. शनि, गुरु, देवयानी दीर्घिका, काही तारकासमुह , नेब्युला हे प्रत्यक्ष दुर्बिणीद्वारे पाहता आल्यामुळे विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित झाला होता. या आकाश दर्शनाच्या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना आकाशातील अनेक ग्रहताऱ्यांची ओळख झाली. ध्रुव तार्याच्या स्थानावरुन दिशा कशा ओळखायच्या, याचेही ज्ञान मिळाले. कृष्णविवर, नवीन तार्यांचा जन्म याबद्दल शास्त्रीय माहिती मिळाली. त्यामुळे विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन दृढ होण्यास मदत झाली.
ओझर विद्यामंदिरमध्ये आकाश दर्शनाचा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी ओझर विद्यामंदिरचे उपक्रमशील शिक्षक प्रवीण पारकर यांनी मेहनत घेतली. या अवकाश दर्शन कार्यक्रमाचा प्रशालेतील विद्यार्थी, शिक्षक आणि पालक वर्गानेही आनंद घेतला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशालेच्या वतीने अनेक नवनवीन उपक्रम राबवत असल्याबद्दल पंचक्रोशीतील पालकांनी समाधान व्यक्त केले. प्रशालेच्या संस्थेच्या आणि पालकांच्या सहकार्यामुळे असे उपक्रम राबविणे शक्य होत असल्याचे प्रशालेचे मुख्याध्यापक प्रतापराव खोत यांनी सांगितले.