विशेष वृत्त
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर (विशेषवृत्त) : सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग” या रक्तदान, देहदान, अवयवदान व रुग्णमित्र या क्षेत्रात कार्यरत असणार्या शासन नोंदणीकृत संस्थेने स्थापनेपासूनच आत्तापर्यंत आपल्या असंख्य रक्तदात्यांच्या रक्तदानाच्या दैवी कार्याने अनेक रुग्णांचे जीव वाचविलेले आहेत. एवढेच नव्हे तर दूर्मिळ रक्तगटाच्या रुग्णांनासुद्धा वेळेवर रक्तपुरवठा करुन त्यांना जीवनदान दिलेले आहे.
२५ डिसेंबर रोजी उत्तम नाईक (वय वर्षे ७५), रा. वायंगणतड, भेडशी ता. दोडामार्ग या वयोवृद्ध आजोबांसाठी दूर्मिळ अशा “ए निगेटीव्ह” रक्तगटाची कंबरेच्या शस्रक्रियेवेळी आत्यंतिक आवश्यकता होती. त्यावेळी केलेल्या विनंतीला मान देऊन “सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान” चे तीन नियमित रक्तदाते श्री. सुदर्शन पट्टे, (आरोग्य विभाग, दाणोली.), श्री. नितिन परब (तळावडेकर), मातोंड व श्री. किशोर चिटणीस, सावंतवाडी या तिघांनीही अत्यंत व्यग्र असतानासुद्धा फोन केल्यानंतर केवळ अर्ध्या तासामध्ये सावंतवाडी रक्तपेढीमध्ये तातडीने येऊन रक्तदान केले. विशेष म्हणजे या तिघांनीही आत्तापर्यंत केवळ “आॅन काॅल, इमर्जन्सी” रक्तदान केले आहे. या तिघांच्याही कार्यतत्परतेला सलाम. यावेळी “सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान” चे सावंतवाडी तालुका सचिव श्री. बाबली गवंडे या तिघांच्याही समवेत उपस्थित होते.
श्री. सुदर्शन पट्टे यांचे हे तिसरे रक्तदान असून सुट्टीचा दिवस असुनही तसेच स्वतःची मुलगी आजारी असुनही प्रसंगाचे गांभीर्य ओळखून त्यांनी रक्तदान केले.
श्री. नितिन परब (तळावडेकर) यांचे हे सहावे रक्तदान असुन त्यांनी मातोंडला आपल्या घरी बांधकाम सुरु असताना सुद्धा दुपारच्या जेवणानंतर आराम करण्याच्या वेळेत येऊन रक्तदान केले. नितिन परब हे कामानिमित्त गोव्याला असतात, मात्र काम असल्याने ते गावी आले होते. नितिनजींनी यापूर्वी संध्याकाळच्या वेळी ओरोसला जाऊन तसेच इमर्जन्सीचेवेळी GMC मध्ये एका श्रीमंत वयोवृद्ध आजीसाठी सुद्धा रक्तदान केले होते. त्यावेळी त्या आजीचे नातेवाईक कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी काही रक्कम देऊ इच्छित होते, पण नितिनजींनी विनम्रपणे नकार दिला होता.
श्री. किशोरजी चिटणीस यांचे हे तब्बल एकोणतीसावे रक्तदान तर या वर्षातील सलग चौथे रक्तदान असून आज आपल्या व्यवसायानिमित्त सकाळी ते देवगडला आणि त्यानंतर दुपारी दोडामार्गला जाऊन तीन वाजेपर्यंत घरी आले आणि त्यानंतर फ्रेश होऊन संध्याकाळी सात वाजता रक्तपेढीमध्ये येऊन रक्तदान केले. यापूर्वी त्यांनीसुद्धा बिटाथॅलेसेमिया असणार्या गरोदर भगिनीसाठी ती सुखरुप बाळंत होईपर्यंत तीनवेळा तर चतुर्थीसणाचे वेळी कुटुंबियांसमवेत नातेवाईकांकडे गेले असतानासुद्धा एका पेशंटला गरज असताना घरी परततानाच ओरोस रक्तपेढीमध्ये रक्तदान केले होते. यावेळी श्री. बाबली गवंडे यांनी विशेष प्रयत्न केले.
ह्या तिघांचेही रक्तसंकलन करण्यासाठी सावंतवाडी रक्तपेढीचे रक्तसंक्रमण तज्ञ श्री. संजयजी धोंड यांनी विशेष मेहनत घेतली. या दरम्यान रक्तपेढीमध्ये असताना झोळंबे गावातील एका ज्ञानेश्वर गवस नावाच्या पेशंटला फ्री रक्त उपलब्ध करुन देताना आपल्या “सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान” च्या सदस्यांनी डोनर कार्डही दिले, तसेच केसरी येथील हरीश्चंद्र सावंत या पेशंटला बी पाॅझिटीव्ह रक्तही उपलब्ध करुन दिले. “सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग” या संस्थेने अथक प्रयत्न करुन या दूर्मिळ रक्तदात्यांच्या प्रतिसादाने रुग्णांना मदत झाली.