गेल्यावर्षी २६ जाने. ला ग्रामस्थांनी उपोषण केले मात्र वर्ष झाले तरी अद्याप कोणतीही कार्यवाही नाही
शिरगाव/संतोष साळसकर : शासन-प्रशासन,लोकप्रतिनिधी निवडणुकांमध्ये मग्न आहेत.मात्र लोकांच्या मूलभूत गरजा असलेल्या रस्त्याच्या डांबरीकरणाकडे कुणाचेही लक्ष नाही.निवडणुकीच्या तोंडावर फक्त आश्वासनाची खैरात होते.पण प्रत्यक्षात मात्र रस्त्याची साधी डागडुजीही होत नाही.सिंधुदुर्ग जिल्ह्यात बहुतांशी ग्रामीण रस्त्याची फारच दयनीय अवस्था झाली आहे.शिरगाव-साळशी,साळशी-चाफेड,साळशी-कुवळे या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे.याबाबत ग्रामस्थांनी वेळोवेळी सार्व.बांधकाम उपविभाग देवगड यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करूनही दुर्लक्ष केले जात असल्यामुळे ग्रामस्थांच्या सहनशीलतेचा आता उद्रेक झाला असून येत्या शनी.२५ डिसें.रोजी स.१० वा. साळशी ग्रामस्थ ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषणाला बसणार आहेत. अन्न, वस्त्र,पाणी,निवारा,रस्ते या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत.यापैकी सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रत्येक गावातील रस्त्याची अवस्था पाहिली तर आपण खरच स्वातंत्र्यात आहोत की पारतंत्र्यात? पृथ्वीवर आहोत की चंद्रावर? याच संभ्रमात जनता आहे.एकीकडे राज्यात अनेक कोटींचा भ्रष्टाचार बाहेर काढला जात आहे.तोच पैसा रस्त्याच्या डांबरीकरणाला वापरला तर हेच रस्ते कायमचे सुस्थितीत रहातील. लोकप्रतिनिधी,नेतेमंडळी निवडणुकामध्ये मग्न आहेत.निवडणुका आल्या की याच खड्डेमय रस्त्यावरून लोकांपर्यंत मते मागायला येतात.आणि निवडून गेल्यावर मात्र रस्ता तसाच अनेकवर्षे खड्डेमय रहातो. त्याकडे कोणाचाच लक्ष जात नाही.अशी ग्रामस्थांची कैफियत आहे.साळशी-शिरगाव पुढे चाफेड,कुवळे,सांडवे पर्यत रस्त्याची अवस्था खूपच बिकट झाली आहे.गतवर्षी २६ जाने. ला साळशी,कुवळे ग्रामस्थांनी उपोषण केले.त्यावेळी सार्व.बांधकाम उपअभियंता देवगड यांच्याकडून लेखी आश्वासन मिळाल्याने ग्रामस्थांनी उपोषण मागे घेतले.मात्र एक वर्ष उलटूनही अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झाली नाही.त्यामुळे अखेर ग्रामस्थांना नाविलाजने २५ डिसें.ला उपोषणाला बसावे लागते आहे.या उपोषणाच्या लेखी निवेदने मुख्यमंत्री कार्यालय यांच्याकडे पाठवल्या असून त्याच्या माहितीसाठी प्रति बांधकाम मंत्री,जिल्हाधिकारी,जिल्हा पोलिस अधीक्षक,कार्यकारी अभियंता-सार्व.विभाग कुडाळ,कणकवली यांनाही देण्यात आल्या आहेत.