बांदा /राकेश परब : कोरोना महामारीच्या काळात प्राथमिक स्तरापासून उच्च शिक्षणासाठी ऑनलाईन शिक्षणावर भर देण्यात आला. मुलांनी ऑनलाईनच्या माध्यमातून आधुनिक शिक्षणप्रणाली व नवनवीन अभ्यासक्रम जरूर आत्मसात करावे, मात्र मोबाईलचा अतिरेक वापर टाळावा असा सल्ला गोव्यातील उद्योजक तथा शाम इंडस्ट्रीयल सर्व्हिसेसचे मॅनेजिंग पार्टनर सखाराम गवस यांनी येथे मुलांना दिला . येथील जिल्हा परिषद केंद्रशाळेत गवस यांनी मुलांना दिलेल्या डेस्कबेंचचे अनावरण श्री गवस यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी मुलांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश मोरजकर, उपाध्यक्ष श्रध्दा नार्वेकर, उमेश तळवणेकर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अन्वर खान, राजकुमार गोणे, चंदू मळीक, रमेश गावकर, मुख्याध्यापिका उर्मिला मोर्ये, राकेश परब आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सखाराम गवस यांच्या माध्यमातून देण्यात आलेल्या ५० हजार रुपये किमतीचे डेस्क, बेंचचे फीत कापून अनावरण करण्यात आले. राजकुमार गोणे म्हणाले की, मुलांनी खुप शिकून मोठे व्हावे. मात्र आपल्या शाळेने दिलेले शिक्षण व संस्कार कधीही विसरू नये.
यावेळी सखाराम गवस यांनी शाळेच्या विविध शैक्षणिक उपक्रमांचे कौतुक केले. यापुढेही भविष्यात शाळेच्या शैक्षणिक व भौतिक गरजांसाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. मान्यवरांचे स्वागत निलेश मोरजकर यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचलान उपशिक्षक जे. डी. पाटील यांनी केले. तर आभार उर्मिला मोर्ये यांनी मानले.