बांदा/राकेश परब : बांदा येथील दिव्यज्योती इंग्लिश मिडियम प्रशालेनजीक राम मंदिरासमोरील मार्गावर सातत्याने गव्याचे दर्शन होत आहे. गव्यांचा कळपच या भागात कार्यरत असून मार्गावरुन ये जा करणार्या ग्रामस्थांच्या नजरेस कळप पडताे. याच मार्गावरुन प्रशालेचे शेकडो विद्यार्थी येजा करीत असतात. गाड्या किंवा मनुष्यांना गवे घाबरत नाहीत. रस्त्यावरच ठाण मांडून राहत असल्याने धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे. वाफोली येथील शैलेश गवस हे आपल्या मुलांना शाळेतून आणण्यासाठी जात असताना गवा नजरेस पडला. बर्याच वेळानंतर गवा रस्त्यापासून काहीसा दूर गेला. गवस पुन्हा शाळेतून येत असताना सदर गवा पुन्हा त्याच ठिकाणी निदर्शनास पडला. काही विद्यार्थी याच मार्गाने चालत येजा करतात. गव्यांच्या सातत्यपूर्ण वावरामुळे परिसरात घबराटीचे वातावरण आहे.
गव्यांचा कळप भरवस्तीपर्यंत येत असल्याची माहिती वनविभागाला दिल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले.