पालकमंत्री यांना शेतकरी सहकारी संघाचे पत्र
कणकवली / उमेश परब – आधारभुत किंमत खरेदी योजना 2021-22 साठी भात खरेदी करीता ऑनलाईन शेतकरी नोंदणीसाठी 31 जानेवारी 2022 पर्यंत मुदतवाढ मिळावी अशा मागणीचे पत्र पालकमंत्री उदय सामंत यांना कणकवली शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष प्रकाश सावंत यांनी दिले आहे. सिंधुदुर्गात भाताची खरेदी महाराष्ट्र स्टेट को.ऑप. मार्केटींग फेडरेशनतर्फे सुरू झाली आहे. परंतु भात खरेदीसाठी वारंवार संगणकीकृत नोंदणी आवश्यक आहे. मध्यंतरी झालेल्या अवकाळी पावसामुळे अनेक भागात इंटरनेट सेवा खंडीत होती. तसेच तलाठीसुध्दा नियमित उपलब्ध नव्हते. शासनाच्या पोर्टलवर नोंदणी करताना रब्बी व खरीप यामध्ये तांत्रिक अडचणी आहेत. 2020-21 या खरीप हंगामात भात खेरीसाठी कणकवली शेतकरी संघाकडे 600 शेतकर्यांनी नोंदणी केली होती. मात्र 2021-22 या हंगामात आतापर्यंत केवळ 36 शेतकर्यांनाच नोंदणी करणे शक्य झाले आहे. त्यामुळे कणकवली तालुक्यातील शेतकर्यांचे होणारे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी ऑनलाईन शेतकरी नोंदणीकरीता 31 जानेवारी 2022 पर्यंत मुदत वाढविण्यासाठी शासनाकडे आपण विनंती करावे असे पत्र पालकमंत्री उदय सामंत यांना कणकवली शेतकरी संघाचे उपाध्यक्ष प्रकाश सावंत यांनी दिले आहे.