माजी आमदार वैभव नाईक वाढदिवस विशेष लेखन.
विशेष लेख ( लेखक : अनुपम कांबळी) : दिनांक २३ नोव्हेंबर २०२४ रोजी विधानसभा निवडणुकीत कुडाळ-मालवण मतदारसंघात वैभव नाईकांचा पराभव झाला. टेलिव्हिजनवर ही बातमी ऐकताना अनेकांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या. याअगोदर कोकण रेल्वेचे शिल्पकार असलेल्या प्रा. मधु दंडवतेंचा १९९१ साली लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर अशाच प्रकारे सिंधुदुर्गातील जनता हळहळली होती. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर कुडाळ येथील पक्षीय मेळाव्यात “मला आता आमदार म्हणू नका” असे भावुक उद्गार काढून वैभव नाईकांच्या अश्रुचा बांध फुटला, तेव्हा तो व्हिडीओ सोशल मीडियावर पाहताना राजकारणाशी काडीमात्र संबंध नसलेलेही अनेकजण गहिवरले. काही पराभव हे जिव्हारी लागतात कारण पराभूत झालेल्या नेत्याने जय – पराजयाच्या पलीकडे जावुन जनतेच्या मनात आपले स्थान निर्माण केलेले असते. वैभव नाईक हे त्या नेत्यांपैकीच एक आहेत.
‘सदैव तुमच्यासोबत’ या उक्तीला जागुन त्यांनी गेली दहा वर्षे तळागाळातील जनतेशी घराघरात पोहोचून संपर्क ठेवला, ही गोष्ट त्यांचे राजकीय विरोधक सुद्धा नाकारू शकत नाहीत. त्यांच्या पराभवाचे एकाच वाक्यात वर्णन करावयाचे झाल्यास ‘निष्ठावंताच्या गळ्यात धोंडा, पक्षबदलूना मणीहार’ असेच करावे लागेल. या पराभवानंतर ‘निष्ठेचे पाईक, वैभव नाईक’ हे अभिमानाने मिरवले जाणारे ब्रीदवाक्य एक जीवंत आख्यायिका बनली. शिवसेनेतील पक्षफुटीनंतर दोन तृतीयांश बहुमत गाठण्यासाठी एक – एक आमदार महत्वाचा बनलेला असताना वैभव नाईकांना गुवाहाटीला जाण्यासाठी पन्नास कोटींची ऑफर आली होती. एकनाथ शिंदेंचे आणि त्यांचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध देखील होते. त्यामुळे गुवाहाटी गाठल्यानंतर त्यांचा मंत्रीमंडळातील समावेश निश्चित होता. मात्र मंत्रीपद आणि वैभव नाईक यांच्यामध्ये निष्ठेची भिंत उभी होती आणि ती भिंत त्यांनी शेवटपर्यंत कधीही ओलांडली नाही. राजकीय स्वार्थ आणि महत्वाकांक्षेपोटी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंशी आणि निवडून देणाऱ्या जनतेशी बेईमानी करणे त्यांना जमले नाही. कर्णाला युद्धाच्या निर्णायक क्षणी विद्येचे विस्मरण होईल हा शाप होता. रथाचे चाक युद्धभूमीवर अडकेल हा सुद्धा शाप होता. इंद्राने कपटकारस्थान करून कर्णाला जन्मतः मिळालेली कवचकुंडले काढून घेतली होती. अर्जुनाच्या रथाचे सारथ्य भगवान श्रीकृष्ण करीत होते आणि रथावर महाबली हनुमान विराजमान होते. आपल्या संभाव्य पराभवाची कर्णाला पूर्ण कल्पना होती तरीही तो रणांगणावर आपल्या प्रिय मित्रासाठी लढला आणि वीरगतीला प्राप्त झाला. कर्णाला ‘अंगराज कर्ण’ बनवणारा त्याचा मित्र होता. तो मित्र त्याच्या आयुष्यात आला नसता तर त्याची हेटाळणी ‘सुतपुत्र कर्ण’ म्हणूनच झाली असती. उद्धव ठाकरे पक्षप्रमुख म्हणून वैभव नाईकांच्या आयुष्यात आले नसते तर कदाचित ‘आमदार’ ही उपाधी त्यांच्या नावामागे कधी लागलीच नसती. त्यांनी आयुष्यभर पक्षप्रमुखांच्या उपकारांची जाण ठेवली. छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे ज्याप्रमाणे शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या राजाशी प्रामाणिक राहिले, त्यांचाच आदर्श ठेवून वैभव नाईक उद्धव ठाकरेंशी प्रामाणिक राहिले. स्वराज्याशी बेईमानी करणारा सूर्याजी पिसाळ होण्यापेक्षा त्यांनी पावनखिंडीत आपल्या प्राणांचे बलिदान देऊन राजाला गडावर पोहोचवणाऱ्या बाजीप्रभू देशपांडेंचा आदर्श घेतला. गद्दार खंडोजी खोपडे होण्यापेक्षा ‘आधी लग्न कोंढाण्याचे मग रायबाचे’ सांगणाऱ्या तानाजी मालुसरेंचे ते पाईक झाले. त्याचीच बक्षिसी म्हणून की काय विधानसभा निवडणुकीत अनपेक्षित पराभव त्यांच्या नशीबी आला. ज्यांनी आपल्याला राजकीय अस्तित्व मिळवून दिले, त्यांच्याच पाठीत खंजीर खुपसून, त्यांच्या वाईट काळात त्यांची साथ सोडून, स्वतःचा राजकीय स्वार्थ साधायचा, ही गोष्टच त्यांच्या सदसद्विवेकबुद्धीला कधीही पटणारी नव्हती. गद्दारी करून मिळालेल्या विजयापेक्षा निष्ठेने मिळालेला पराभव त्यांना अधिक जवळचा वाटला. शेवटी इतिहास हा निष्ठावंतांचाच लिहिला जातो, गद्दारांचा नाही…!
मुळात ही विधानसभा निवडणूक फक्त आमदारकीसाठी नसून महाराष्ट्रधर्माच्या रक्षणासाठी लढल्या जात असलेल्या युद्धासारखी आहे, याची वैभव नाईकांना पुरेपूर जाणीव होती. एकीकडे केंद्रातील सत्ता, पंतप्रधानांचे मित्र असलेले उद्योगपती, ईडी, सीबीआय, इन्कमटॅक्स, निवडणूक आयोग, कोर्ट अशा सत्ताधाऱ्यांच्या रखेल बनलेल्या स्वायत्त यंत्रणा होत्या आणि दुसरीकडे आपल्या पक्षाशी निष्ठावान असलेले असंख्य कार्यकर्ते होते. दिल्लीतील सत्ताधाऱ्यांना वाटले होते की सरकार पाडल्यानंतर आणि पक्ष चोरल्यानंतर उद्धव ठाकरे गुडघे टेकून सपशेल शरणागती पत्करतील. मात्र त्यांनी दिल्लीश्वरांना दाखवून दिले की, हिमालयापुढे सह्याद्री कधी झुकला नाही आणि झुकणारही नाही. छत्रपती संभाजी महाराजांचा मेहुणा गणोजी शिर्के फितूर झाला पण कवी कलश त्यांच्यासोबत शेवटच्या क्षणापर्यंत ठाम राहिले. त्यांचा सुद्धा शंभूराजेंप्रमाणे पाशवी छळ करण्यात आला पण त्या नरकयातनाही त्यांनी तितक्याच हिंमतीने सहन केल्या. उद्धव ठाकरे महाराष्ट्रधर्माच्या रक्षणाची लढाई लढत असताना त्यांच्यासोबत ठामपणे उभे राहिल्यामुळे वैभव नाईकांची एसीबी चौकशी लावण्यात आली. त्यांच्या राहत्या घराची मापे घेण्यात आली. त्यांची पत्नी आणि सख्खा भाऊ यांना विनाकारण चौकशीच्या फेऱ्यात ओढण्यात आले. तरीही त्यांनी शेवटपर्यंत पक्षप्रमुखांची साथ सोडली नाही. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात पैशांचा पाऊस पडला, ही वस्तुस्थिती आहे. ज्यांचा मुंबईतील धारावीवर डोळा आहे अशाच उद्योगपतींकडून सत्ताधारी पक्षाला हा पैसा पुरवण्यात आला. गेल्या अडीच वर्षात महाराष्ट्रातले अनेक मोठे प्रकल्प, उद्योगधंदे गुजरातला नेण्यात आले. देशातील मुंबईचे महत्व कमी करण्यासाठी आणि महाराष्ट्राला आर्थिकदृष्ट्या खिळखिळे करण्यासाठी गुजरात लॉबी जाणीवपूर्वक काम करत होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी दोन वेळा केलेल्या सुरतेच्या लुटीचा बदला गुजरात लॉबीकडून घेतला जात होता. लोकसभा निवडणुकीत कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघात विरोधी उमेदवाराला २६ हजारांचे मताधिक्य मिळाले, तेव्हाच पैशांच्या या पाशवी ताकदीसमोर आपला निभाव लागणार नाही, याची वैभव नाईकांना पुर्ण कल्पना आली होती. त्यांच्याकडे शिंदे गटाकडून विधानसभा निवडणूक लढवण्याची खुली ऑफर होती. मग काय महाराष्ट्रद्रोह्यांशी हातमिळवणी करायची…? महाराष्ट्राच्या मातीशी बेईमानी करायची…? मुंबई महाराष्ट्राला मिळवण्यासाठी १०६ हुतात्म्यांनी आपले बलिदान दिले होते. तीच मुंबई गुजरात लॉबीच्या घशात घालू पाहणाऱ्यांसोबत हातमिळवणी करणे म्हणजे साक्षात आईशी बेईमानी करण्यासारखेच होते. जर प्रश्न महाराष्ट्राच्या मातीच्या रक्षणाचा असेल तर अशा शंभर आमदारक्या ओवाळून टाकण्याची तयारी असली पाहिजे. निष्ठेपायी घरादारावर पाणी सोडण्याचा आपला इतिहास आहे. जेव्हा अफझलखानाने स्वराज्यावर आक्रमण केले तेव्हा अशीच धाक – दपटशाही करून त्याने स्वराज्यातील एक – एक सरदार फोडायला सुरुवात केली. त्यावेळी कान्होजी जेधे – नाईक यांच्यासारखे मावळे घरादारावर तुळशीपत्र ठेवुन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. जेव्हा आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा गुजरात लॉबीने महाराष्ट्रावर आक्रमण केल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या पाठीशी ठामपणे उभे राहणाऱ्या वैभव नाईकांचे नाव निश्चितपणे सुवर्णाक्षरात लिहिले जाईल. महाराष्ट्रधर्म रक्षणासाठी पेटवलेल्या या यज्ञात वैभव नाईकांनी अनेक अमिषाना झूगारून देत खऱ्या अर्थाने आपल्या आमदारकीची आहुती दिली. त्यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झालेला असला तरी इतिहासात मात्र ते अजरामर झाले.
इतिहासकारांनी पानिपतचे वर्णन ‘पराजयातला असामान्य विजय’ असे केले आहे. पानिपतच्या युद्धात मराठे हरले हा इतिहास आहे. पण ताज्या दमाच्या अफगाणी फौजांपुढे परमुलखात जाऊन मराठी फौजांनी अतुलनीय शोर्य गाजवले आणि मराठी माणसाच्या लढवय्या बाण्याचे दर्शन शत्रूला घडवले. जिगरबाज मराठा तलवारींची अहमदशहा अब्दालीने एवढी धास्ती घेतली की, विजयी होऊन सुद्धा पुन्हा हिंदुस्थानावर आक्रमण करायचे त्याच्यात धाडस राहिले नाही. आता कित्येक शतकांनंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रावर दिल्लीतला अहमदशहा अब्दाली आक्रमण करू पाहत होता. पानिपतच्या युद्धात मराठ्यांकडे बंदुकाच नव्हत्या. ताज्या दमाच्या अब्दालीच्या फौजेसमोर तसही तलवारीने लढणारे मराठे किती काळ तग धरणार होते…? आताच्या अब्दालीकडे ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्ससारख्या यंत्रणा, केंद्रातील सत्ता आणि उद्योगपतींचा अमाप पैसा असे सर्व काही होते. उद्योगपतींकडून मिळालेला अमाप पैसा आणि लाडकी बहीणसारख्या शासकीय योजनांच्या माध्यमातून केलेली सरकारी पैशांची खैरात यासमोर नुसत्या निष्ठेचा कुठपर्यंत निभाव लागणार होता…? विद्या विसरावी, चाक रुताव, कवचकुंडले काढून घ्यावी, तरीही हिंमतीने कुरुक्षेत्रावर उभे राहावे हाच खरा पुरुषार्थ आहे. हाच खरा पराक्रम आहे. ‘मरहट्टा कधी न संगरातुनी हटे ,मारुनी दहास एक मरहट्टा कटे…’ या उक्तीप्रमाणे वैभव नाईकांनी आहे त्या ताकदीनिशी अब्दालीच्या ताकदवर फौजेसोबत शेवटपर्यंत निकराने संघर्ष केला. पानिपतच्या युद्धात नरवीर दत्ताजी शिंदे जमिनीवर कोसळल्यानंतर कुतुबशहा त्यांच्या डोळ्यासमोर भाला नाचवत म्हणाला, “क्यू दत्ताजी…? और लढोगे… ?” हे ऐकताच उरलीसुरली सर्व ताकद एकवटून रणझुंजार दत्ताजी शिंदेनी वाघासारखी डरकाळी फोडली- “क्यो नही…? बचेंगे तो और भी लढेंगे…!” विधानसभा निवडणुकीत वैभव नाईकांचा पराभव झालेला असला तरी त्यांनी दाखवलेली लढवय्या वृत्ती ही महाराष्ट्राच्या महान परंपरेला साजेशी अशीच होती.
विधानसभा निवडणुकीत महायुतीला पाशवी बहुमत मिळाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात महाविकास आघाडीतील तीनही पक्षांना गळती लागली. सत्तेची उब घेण्यासाठी अनेक कार्यकर्त्यांनी धडाधड सत्ताधारी पक्षात प्रवेश केले. सिंधुदुर्ग जिल्हा सुद्धा याला अपवाद नव्हता. खरं तर पराभवानंतर मैदान सोडून शत्रूपक्षात पळून जाणारे कार्यकर्ते हे महाराष्ट्राच्या जाज्वल्य परंपरेला लागलेली एक प्रकारची किडच म्हणावी लागेल. त्यांनी मराठ्यांच्या पराक्रमी इतिहासाचे अवलोकन करणे गरजेचे आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबालाही विकृत आनंद झाला होता. त्याला वाटले होते की शंभूराजे गेले म्हणजे मराठयांना आता कुणी वालीच उरलेला नाही. छत्रपती संभाजी महाराजांच्या रक्ताच्या थेंबातुन महाराष्ट्राच्या याच मातीत असंख्य शूरवीर जन्माला आले. संताजी-धनाजी यांनी थेट औरंगजेबाच्या छावणीवरच धाडसी हल्ला करून त्याच्या छावणीचे कळस कापून नेत मोगल सैन्याला धडकी भरवली. त्यानंतर औरंगजेब इतका घाबरला की त्याला रात्रीच्या स्वप्नात सुद्धा संताजी-धनाजी दिसू लागले. एकदा वैतागलेला औरंगजेब आपल्या सरदारांना म्हणाला- “ये मरहट्टे किस चक्की का आटा खाते है…?” कोणत्याही राजाशिवाय सलग चौदा वर्षे हा महाराष्ट्र औरंगजेबाशी टक्कर घेत राहिला आणि अखेर याच महाराष्ट्राच्या मातीत औरंगजेबाची कबर बांधून मगच शांत झाला…! आज त्याच महाराष्ट्रात काहीजण सत्तेची फळे चाखण्यासाठी महाराष्ट्रद्रोह्याशी लढण्याऐवजी शेपट्या आत घालून पळपुटेपणा करणार असतील तर ही गोष्ट नक्कीच लांच्छनास्पद अशीच आहे. अर्थात लढणाऱ्या मातीत अपवाद म्हणून काहीजण पळपुटे जन्माला आले असतीलही पण याद राखा हा छत्रपती संभाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्र कधीही कुणासमोर गुडघे टेकत नसतो. महाराष्ट्र हा सतत लढत राहतो. महाराष्ट्र हा अन्यायाच्या टाचेखाली फार काळ दबला जात नसतो, तो उसळतोच…! याच महाराष्ट्रात वैभव नाईकांसारखे लढवय्ये जन्म घेतात आणि शेवटपर्यंत लढत राहतात. जय महाराष्ट्र बोलायला सोपे असते पण पेलायला अवघड…! लढण्याची हिंमत असणाऱ्यांनीच महाराष्ट्रधर्माच्या बाता कराव्यात, पळपुट्यानी नाही…! मूठभर स्वाभिमानी मर्दानी महाराष्ट्र लढला, घडवला आणि वाढवला. त्यामुळे दिल्लीतील सत्ताधीशांना कविवर्य सुरेश भटांच्या शब्दांत एवढेच सांगायचे आहे- “करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही…!”
सध्या ‘ऑपरेशन टायगर’ या गोंडस नावाखाली विरोधी पक्षातील माजी आमदारांचे सत्ताधारी पक्षात प्रवेश करून घेतले जात आहेत. सत्ताधारी पक्षाला महाराष्ट्रात कुणी राजकीय विरोधकच शिल्लक ठेवायचे नाहीत. खरं तर हे ऑपरेशन टायगर वगैरे काहीही नसून जुन्या गद्दारांनी नवीन गद्दारांसाठी उघडलेले सत्तेचे दालन आहे. समोर दोन-चार तुकडे टाकून बघायचे… आलं तर कुत्र, नाहीतर वाघ…! वैभव नाईक नावाच्या ढाण्या वाघाने कोकणात या ऑपरेशन टायगरची हवाच काढून टाकली आणि येणाऱ्या काळात आपण संघर्षासाठी तयार आहोत, हा संदेश सत्ताधारी पक्षाला दिला. त्यांच्यासाठी संघर्ष हा काही नवीन नाही. किंबहुना संघर्षाचे दुसरे नावच वैभव नाईक आहे. त्यांनी २००८ साली शिवसेनेत प्रवेश केला आणि त्यानंतर वर्षभरातच पहिली विधानसभा निवडणुक लढवली. त्यावेळी मतदानाच्या आदल्या दिवशी त्यांचा रात्रीच्या अंधारात थरारक पाठलाग करण्यात आला तर मतदानादिवशी थेट डोक्यावर रि्व्हॉल्वर रोखण्यात आली. त्यादिवशी दैव बलावत्तर होते म्हणून ते जीवानिशी वाचले पण प्रतिकूल परिस्थितीतही ते काही संघर्षातून मागे हटले नाहीत. त्यांनी पुढील पाच वर्षे मतदारसंघ पिंजून काढला आणि २०१४ साली माजी मुख्यमंत्र्यांचा पराभव करून ते महाराष्ट्राचे ‘जायंट किलर’ बनले. आता सुद्धा तशीच काहीशी प्रतिकूल राजकीय परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि ती बदलायची असेल तर संघर्ष केल्याशिवाय अन्य कोणताही पर्याय त्यांच्यासमोर दिसत नाही. युद्ध अर्जुनाचे असेल तर त्यालाच हाती धनुष्य घ्यावे लागेल. त्याने सारथी होऊन चालत नाही. जो या मातीचा स्वाभिमान जपतो, शेवटी त्यालाच ही माती तख्तावर बसवते. मला खात्री आहे की स्वाभिमानाशी कधीही तडजोड न करणारे आणि पक्षनिष्ठेपायी आपले राजकीय अस्तित्व पणाला लावणारे वैभव नाईक पुन्हा एकदा कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार होतील. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी त्यांना खूप खुप शुभेच्छा देतो आणि कविवर्य सुरेश भट यांच्या गाजलेल्या कवितेतील ओळीनी माझ्या लेखाचा शेवट करतो- “विझलो आज जरी मी, हा माझा अंत नाही… पेटेन उद्या नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही…!”
लेखक : अनुपम कांबळी.