विविध योजनातील लाभार्थ्यांना लाभपत्र व लाभांचे वितरण.
मालवण | ब्यूरो न्यूज : कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग अंतर्गत पंचायत समिती मालवण, एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी, महिला बाल कल्याण, उमेद कार्यालय मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने महिला मेळावा संपन्न झाला. केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून उपलब्ध कोट्यावधी रुपये निधीतून मालवण तालुक्यात सन २०२४-२०२५ या आर्थिक वर्षात विविध प्रकारच्या योजना राबविण्यात आल्या. त्या योजनांचे विविध लाभ दिलेल्या योजनांचे प्रतिनिधिक स्वरूपात वितरण आमदार निलेश राणे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते लाभार्थीना करण्यात आले.

यावेळी संबोधित करताना आ. निलेश राणे म्हणाले की, महायुती सरकारच्या माध्यमातून मतदार संघात अधिकाधिक विकासनिधी आणून मागील दहा वर्षातील बॅकलॉग भरून काढायचा आहे. गतिमान विकासातून कुडाळ मालवण मतदारसंघ राज्यात टॉप फाईव्ह मतदार संघात आणण्यासाठी प्रयत्नशील असून माता भगिनींसह सर्व जनतेला अपेक्षित असे कार्य करण्यासाठी सदैव तत्पर आहे. मालवण कोळंब येथील समर्थ मंगल कार्यालय सभागृहात हा मेळावा आयोजित करण्यात आला.

यावेळी मालवण पंचायत समिती गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर, पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे, उद्योजक तथा शिवसेना उपनेते संजय आंग्रे, उद्योजक तथा शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, गटशिक्षणाधिकारी संजय माने, आरोग्य अधिकारी सुधीर धनगे, सरपंच सिया धुरी, माजी सभापती राजेंद्र प्रभूदेसाई, अधिकारी भीमसेन पळसंबकर, प्रभाकर जाधव, व्हि. के. जाधव, सुनील चव्हाण, उमेद अभियान व्यवसस्थापक रविकिरण कांबळी, प्रभाग समन्वयक प्रिया धरणे, निशिगंधा तांबे, वर्षा मोंडकर, अदिती धुरी यांसह अधिकारी, कर्मचारी, महिला भगिनी व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी डॉ. कृपा गावडे (आरोग्य), ॲड. प्राजक्ता गांवकर (कायदे), नंदिता सावंत (उद्योग विषयक) मार्गदर्शन उपस्थित महिलांना करण्यात आले. या मान्यवरांचा सन्मान आमदार निलेश राणे यांच्या हस्ते करण्यात आला.
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल योजना अंतर्गत घराची चावी वितरण तसेच घर मंजुरीचे आदेश वितरण जि.प. जिल्हा परिषद २० टक्के सेस अंतर्गत मागासवगीयांना जुने घर दुरस्ती अर्थसहाय्य, शिलाई मशीन, घरघंटी, ग्रासकटर खरेदी अर्थसहाय्य जिल्हा परिषद ५ टक्के अपंग सेस मधुन घरकुल बांधणे अर्थसहाय्य, घरघटी खरेदीसाठी अर्थसहाय्य, व अस्थिव्यंग तीन चाकी गाडी खरेदीसाठी अर्थसहाय्य पंचायती समिती सेस अंतर्गत मागसवर्गीय जुने घर दुरुस्तीसाठी अर्थसहाय्य, ५ टक्के सेस अंतर्गत अपंगाना घर दुरुस्तीसाठी अर्थसहाय्य व १० टक्के सेस माहिला बाल कल्याण अंतर्गत महिलांना जुने घर दुरुस्ती साठी आर्थिक सहाय्य या योजनेंचे लाभार्थीना मंजुर लाभाचे आदेशाचे वितरण असे विविध योजना मधील लाभार्थी यांना लाभपत्र व लाभ वितरित करण्यात आले. विविध विभागात उल्लेखनीय काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांचा सन्मानही यावेळी करण्यात आला. ग्रामसेवक युगल प्रभूगांवकर यांनाही उत्कृष्ट कामगिरी बाबत आमदार निलेश राणे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
गटाविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर यांनी प्रास्ताविक करताना प्राप्त निधी, सर्व योजना, लाभार्थी या सर्वाचा लेखाजोगा मांडला. पंचायत समिती नवी इमारत उभारणी आठ वर्ष रखडली आहे ती पूर्ण व्हावी अशीही मागणी या निमित्ताने करण्यात आली. त्याबाबत आमदार निलेश राणे म्हणाले की, पंचायत समिती नवी इमारत उभारणी लवकरात लवकर केली जाईल. त्यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध केला जाईल. यापुढे विकासासाठी निधी कमी पडणार नाही. यावर्षी जिल्हा नियोजन आराखडा पालकमंत्री नितेश राणे यांनी ४०० कोटींवर नेला. विकासाचा आलेख वाढतच राहणार. ज्या सिंधुदुर्ग जनतेने खासदार, आमदार, पालकमंत्री ही पदे आम्हा राणे कुटुंबियांना दिली. त्यांचे ऋण जनतेला अपेक्षित गतिमान विकासातून फेडण्याचा आमचा प्रयत्न आहे.
गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर यांच्या कामाची आमदार निलेश राणे यांनी प्रशंसा केली.
यावेळी बोलताना उद्योजक व शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी सांगितले की, आ. निलेश राणे यांनी पहिल्या तीन महिन्यातच कोट्यावधी विकास निधी मतदारसंघात आणला. त्यासोबत अभ्यासपूर्ण मांडणी व वक्ताव्याने राणे ब्रँडची अधिवेशनात मोहर उमटवली. प्रत्येक नागरिकाला अभिमान वाटावे असे काम आमदार निलेश राणे करत आहेत.
अंगणवाडी सेविका, मदतनीस यांचेही योगदान, सेवाकार्य मोठे आहे. त्यांनाही अधिकाधिक लाभ मिळवून देण्यासाठी आपले प्रयत्न राहतील. महिला बचतगट प्रतिनिधी, मतदार संघातील माता भगिनी या सर्वाना अपेक्षित असे कार्य करण्यासाठी तत्पर आहे. सत्तेतील आमदाराने एक दिवसही फुकट घालवायचा नसतो. हे राणे साहेबांचे संस्कार आहेत. त्यानुसार नेहमीच जनतेच्या सेवेतच राहणार. असेही आमदार निलेश राणे यांनी सांगितले. .