शिरगाव | प्रतिनिधी : मिलिंद साटम यांच्यासारखा हाडामासाचा, हिंदुत्ववादी प्रामाणिक कार्यकर्ता आज आमच्या कडवट हिंदुत्ववादी भाजपमध्ये प्रवेश करत असल्यामुळे आम्हाला दहा हत्तीचे बळ आले आहे. खऱ्या अर्थाने आज आम्हाला हिरा मिळाला आहे. तुमच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा भाजपमध्ये मानसन्मान केला जाईल. यापुढे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही ताकदीने आमच्या खांद्याला खांदा लावून काम करा. तुमच्या नावापुढे नक्कीच सन्मानाचे पद मिळेल याची मी तुम्हाला ग्वाही देतो, असा विश्वास जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी शिरगांव येथे बोलताना व्यक्त केले.
उबाठा सेनेचे देवगड तालुकाप्रमुख मिलिंद साटम यांच्यासह त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी आज शिरगाव आंबेखोल येथील लोके मंगल कार्यालयात जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी नितेश राणे यांनी सर्वांना भाजपची शाल घालून त्यांचे स्वागत केले. त्यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले आज जुने शिवसैनिक ज्यांनी स्व. बाळासाहेब ठाकरे आणि खासदार नारायणराव राणे यांच्यासोबत काम केले आहे ते आज खऱ्या अर्थाने स्वगृही परतलेले आहेत. याचा आनंद निश्चितच आहे. भाजपमध्ये प्रवेश करण्याची संख्या वाढत आहे. त्यामुळे आता उबाठाचे मोजकेच कार्यकर्ते शिल्लक राहिले आहेत. यापुढे भाजप पक्ष आणि महायुतीचे सरकार मिळून देवगडच्या सर्वांगीण विकास कामासाठी मी पालकमंत्री म्हणून जोमाने काम करणार असे सांगितले. तुम्हाला मी निधी कमी पडू देणार नाही.
यावेळी उबाठा शिवसेनेचे देवगड तालुकाप्रमुख मिलिंद साटम यांच्याबरोबर शिरगांव सोसायटीचे व्हाईस चेअरमन विनायक साटम, शाखाप्रमुख महेश मेस्त्री , शहरप्रमुख वसंत साटम, ग्रामपंचायत सदस्या स्नेहा मेस्त्री तसेच शिरगाव आंबेखोल येथील उपशाखाप्रमुख सिद्धेश लोके, कोंडोशी येथील तंटामुक्त समिती अध्यक्ष अनिल फाटक, हडपिड शाखाप्रमुख सुभाष राणे यांच्यासह सुमारे १३० सेनेच्या कार्यकर्त्यांनी आज भाजपमध्ये जाहीररित्या प्रवेश केला. या सर्वांचे मंत्री नितेश राणे यांनी स्वागत केले.
यावेळी व्यासपीठावर भाजपचे जिल्हा सरचिटणीस संदीप साटम, देवगड तालुका युवा मोर्चा अध्यक्ष अमित साटम, जिल्हा कार्यकारी सदस्य मंगेश लोके, सहदेव लोके, भाजपचे देवगड मंडळ अध्यक्ष राजेंद्र शेट्ये, चाफेड बूथ अध्यक्ष सुनील कांडर, माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष नार्वेकर, चाफेडचे माजी सरपंच सत्यवान भोगले, आकाश राणे, प्रवीण राणे, संतोष कुमार फाटक, संतोष किंजवडेकर, ग्रामपंचायत सदस्या सौ. प्रेरणा कुबडे, शितल तावडे, धनश्री नाईक, माजी सभापती नंदू देसाई, पंकज दुखंडे, देवगड महिला अध्यक्षा सौ. उषःकला केळुसकर, उपाध्यक्षा सौ. श्वेता शिवलकर, देवगड शहर अध्यक्षा सौ. तन्वी शिंदे, नगरसेविका सौ. रुचाली पाटकर आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी संदीप साटम, अमित साटम, सत्यवान भोगले यांनी आपली मनोगते मांडली. सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन शरद साटम यांनी केले.