सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातल्या कोलगांव येथील निरामय विकास केंद्र या सामाजिक संस्थेचा १८ एप्रिल रोजी, २० वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न झाला. हा सोहळा संस्थेच्या अध्यक्ष डाॅ. अनघा सबनीस यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. सोहळ्यात, कणकवली येथील ज्येष्ठ स्त्रीरोग तज्ञ डाॅ. सविता तायशेटे यांना संस्थेच्या संस्थापक दिवंगत डाॅ. शालिनी सबनीस यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ‘आरोग्यलक्ष्मी पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. कोलगांवच्या मूळ निवासी डाॅ. शालिनी सबनीस व सबनीस परिवार यांनी त्यांच्या गावचा विकास करण्यासाठी निरामय विकास केंद्र, कोलगांव ही संस्था स्थापन केली. २००३ मध्ये कोलगांव हायस्कूलच्या परिसरात निरामय विकास केंद्राच्या आरोग्य केंद्राची उभारणी करण्यात आली होती.


दिवंगत डाॅ. शालिनी सबनीस ( संस्थापक – अध्यक्ष, निरामय विकास केंद्र, कोलगांव.)


कार्यक्रमाची सुरवात मंचावरील मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन तसेच संस्थेच्या वतीने सादर झालेल्या ‘निरामय स्वागतगीताने’ करण्यात आली. संस्थेच्या सचिव श्रीम. वंदना करंबेळकर यांनी संस्थेची स्थापना, उद्देश यांची माहिती देत संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. सावंतवाडी तालुक्यातील गरीब लोकांना आरोग्य सेवा व आरोग्य शिक्षण, विद्यार्थ्यांच्या सुप्तगुणांना ओळखून त्यानुसार बौद्धिक व शारिरिक वाढीस पूर्ण वाव देणे, मुलामुलींचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी निवासी शिबिरांचे आयोजन करणे, मुली व महिलांकरिता शिवणकाम वर्गाचे आयोजन करणे, मोफत आरोग्य शिबिर आयोजनाद्वारे आरोग्य सेवा, विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत व मार्गदर्शन ही संस्थेची प्रमुख उद्दिष्टे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी संस्थेची वाटचाल समजावून सांगितली आणि संस्थेची ध्येये, विविध उपक्रम, नियोजित उपक्रम यांची माहिती दिली.

संस्थेच्या अध्यक्ष डाॅ. अनघा सबनीस व मान्यवर यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले व उपस्थित सर्वांना तसेच निरामय विकास केंद्र संबंधित घटकांच्या यशस्वितेसाठी सदिच्छा दिल्या.

डाॅ. अनघा सबनीस. ( अध्यक्ष, निरामय विकास केंद्र, कोलगांव)
मान्यवरांच्या हस्ते ज्येष्ठ स्त्रीरोग तज्ञ डाॅ.सविता तायशेटे यांना ‘आरोग्यलक्ष्मी पुरस्कार’ पुरस्कार प्रदान करुन गौरवण्यात आले.


संस्थेचे सदस्य प्रसाद घाणेकर यांनी डाॅ. सविता तायशेटे यांची मुलाखत घेतली व त्यांचा जीवनपट उलगडला.
यावेळी डाॅ. सविता तायशेटे यांनी निरामय विकास केंद्राच्या विविध उपक्रमांची व उद्देशांची विशेष प्रशंसा केली आणि आरोग्यलक्ष्मी पुरस्कार रुपाने संस्थेशी जोडले गेल्याबद्दल आनंद व्यक्त केला.

या कार्यक्रमात निरामय विकास केंद्र, कोलगांव यांच्या वतीने झालेल्या आर्थिक मदतीच्या सहाय्याने शिक्षण घेतलेल्या यशस्वितांचा ‘विद्यालक्ष्मी पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आला. पुजा बरागडे ( सुवर्णपदक विजेती विद्यार्थीनी व परिचारिका), शुभम पेडणेकर ( अभियंता), प्रशांत झोरे हे विद्यालक्ष्मी पुरस्काराचे मानकरी ठरले.

यंदा, निरामय विकास केंद्र संस्थेच्या वतीने शिक्षिका दिवंगत सुवर्णा सुरेश डेगवेकर यांच्या स्मरणार्थ ‘सुवर्णा शिक्षण पुरस्कार’ प्रदान करण्यात आले आहेत. जे शिक्षक विनाअनुदानीत तत्वावरच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये कार्यरत आहेत अशांना सुवर्णा शिक्षण पुरस्कार देण्यात येत आहे. शिक्षिका दिवंगत सुवर्णा सुरेश डेगवेकर यांच्या कन्या सोनाली ओगले व मुलगा चि. सिद्धेश डेगवेकर यांच्या हस्ते, निरामय विकास केंद्र, कालगाव संस्थेचा वतीने निवडलेल्या पाच शिक्षकांना या पुरसाकाराचे वितरण झाले. शिक्षिका दिवंगत सुवर्णा सुरेश डेगवेकर यांचे पती श्री. सुरेश डेगवेकर यांनी हे पुरस्कार पुरस्कृत केले होते. रोख रुपये ५ हजार व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप होते.



यावेळी शालेय मुलांनी आणि निरामयशी संबंधित युवकांनी संत परंपरेवर आधारीत विविध गुणदर्शन कार्यक्रम सादर केले. उपस्थितांनी त्यांना बक्षिसरुपाने दाद देऊन गौरविले.
मान्यवरांच्या हस्ते, निरामय विकास केंद्र संस्थेच्या २० व्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर भरवण्यात आलेल्या पाककला व रांगोळी स्पर्धेचा बक्षिस वितरण कार्यक्रम संपन्न झाला.
या सोहळ्याला संस्थेच्या अध्यक्ष डॉ. अनघा सबनीस, डॉ. सविता तायशेटे, उपाध्यक्ष सुधा सबनीस, सचिव श्रीमती वंदना करंबेळकर, अर्चना वझे, विनया बाड , प्रसाद घाणेकर,भरत गावडे आणि निरामय विकास केंद्र सहकारी, लाभार्थी मुले व पालक व विविध क्षेत्रातील ग्रामस्थ व नागरीक उपस्थित होते.

सदस्य भरत गावडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर सचिव श्रीमती वंदना करंबेळकर यांनी आभार प्रदर्शन केले.