डिजिटल अरेस्ट, सायबर क्राईम, विविध प्रकारे होणारे स्कॅम, ब्लॅकमेलिंग आणि संबंधित विषयांच्या सावधगिरीबाबत मार्गदर्शन.
मसुरे | प्रतिनिधी : मालवण पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी मसुरे येथे ज्येष्ठ नागरीकांशी नुकताच संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, ज्येष्ठ नागरिक हा समाजातील महत्वाचा घटक आहे. त्यांची काळजी घेणे हे सुद्धा आमचे कर्तव्य आहे. ज्येष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणावर ऑनलाईन तसेच घरी आलेल्या अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवल्याने फसत आहेत. त्याचप्रमाणे घरात अन्य कोणी नसल्याचा फायदा घेत चोरी करत लूटमार करणे अशा गोष्टी वाढत आहेत. ज्येष्ठ ग्रामस्थांनी जागृत राहणे आवश्यक आहे. ज्येष्ठ नागरीकांची सुरक्षितता महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन मालवण पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी मसूरे कावा येथे केले. मसुरे कावावाडी येथील मारुती मंदिर येथे ज्येष्ठ नागरिक संवाद कार्यक्रमाचे आयोजन मालवण पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या उपस्थितीत करण्यात आले होते. देऊळवाडा येथे सुद्धा संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

ज्येष्ठ नागरिकांनी मोबाईल वापरताना जास्त काळजी घ्यावी. सध्या ऑनलाईन फसवण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर होत आहेत. ज्येष्ठ नागरिक अनेक प्रकारच्या येणाऱ्या कॉलवरून आपले बैंक अकाउंट नंबर सांगून ओटीपी देत आहेत. अशाने अनेकांच्या बँकांमध्ये असलेली रक्कम ऑनलाईन पद्धतीने काढली जाते. याशिवाय मोबाईल वरील फेसबुक व्हाट्सअप, इंस्टाग्रामवर अश्लील फोटो व्हिडिओ पाठवून आर्थिक फसवणूक केली जात आहे असे पो. नि. प्रवीण कोल्हे म्हणाले. जेष्ठ नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या.

डिजिटल अरेस्ट, सायबर क्राईम, विविध प्रकारे होणारे स्कॅम, ब्लॅकमेलिंग अशा विविध विषयांशी निगडित मार्गदर्शन केले.पो. नि. प्रवीण कोल्हे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी मसुरे पोलीस दूरक्षेत्रचे कॉन्स्टेबल प्रमोद नाईक, मसूरे गडघेरा पोलीस पाटील प्रेरणा येसाजी, मर्डे पोलीस पाटील प्राजक्ता पेडणेकर, देऊळवाडा पोलीस पाटील नेवेश फर्नांडिस यांच्यासह वासुदेव पाटील, सुभाष वायंगणकर, सोमाजी परब, कमलाकर पेडणेकर, विजयप्रकाश शेडगे, दिगंबर गोलतकर, दिगंबर येसजी, मनीषा येसजी, शारदा येसजी, अनंत मालवणकर, राजाराम येसजी, अशोक मसुरकर, अनंत मालवणकर, तुळशीदास पेडणेकर आदी जेष्ठ नागरिक, ग्रामस्थ उपस्थित होते. पंढरीनाथ मसुरकर यांनी आभार प्रदर्शन केले.