सावंतवाडी | प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून भंडारी समाजाचा एक गौरवशाली इतिहास आहे. स्वराज्याच्या आरमाराचा कणा भंडारी समाज होता.सद्यस्थितीत भंडारी समाज विखुरला गेला असून गतवैभव प्राप्त करण्यासाठी आपल्यातील मतभेद विसरून एक झाले पाहिजे,आज आपण आधुनिक युगात वावरत असलो तरी समाजाने संस्कृती व पंरपरा जतन करावी असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी सावंतवाडी येथे सावंतवाडी तालुका भंडारी मंडळ वधु-वर व स्नेह मेळाव्यात केले. सावंतवाडी तालुका भंडारी मंडळाचा वधु – वर व स्नेह मेळावा रविवार दी १९ जानेवारी २०२४ रोजी येथील राणी पार्वतीदेवी हायस्कूलच्या सभागृहात संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय भंडारी मंडळाचे अध्यक्ष नवीनचंद्र बांदिवडेकर तर प्रमुख अतिथी म्हणून माजी शिक्षणमंत्री व आमदार दीपक केसरकर, भंडारी समाजाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष हेमंत कळंगूटकर व उद्योजक प्रकाश तांबोस्कर हे होते. यावेळी तालुका भंडारी मंडळाचे अध्यक्ष प्रसाद अरविंदेकर, सचिव दिलीप पेडणेकर, उपाध्यक्ष गुरुनाथ पेडणेकर, देविदास आडारकर, बाळा आकेरकर, हनुमंत पेडणेकर, खजिनदार चंद्रकांत वाडकर, राजेंद्र बिर्जे, नीलेश कुडव, संजय पिळणकर, सिद्धार्थ पराडकर, लवू कुडव, ज्ञानदीप राऊळ, नंदकिशोर कोंडये, बाळू साळगावकर, दीपक जोशी,भंडारी मंडळ महिला अध्यक्षा शीतल नाईक, समता सुर्याजी, डॉ.दिनेश नागवेकर, भंडारी पतसंस्थेचे चेअरमन गुरूदास पेडणेकर, ज्ञानदीप राऊळ, विलास मळगावकर, विकास केरकर, नाना मसुरकर, सुधीर आडिवरेकर, सौ. प्रतिभा कांबळी, सौ.वैशाली पटेकर, भरत कांबळी आदी उपस्थित होते.

यावेळी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक म्हणाले की सावंतवाडी तालुका भंडारी मंडळाने वधू – वर मेळावा आयोजित करून चांगला उपक्रम हाती घेतला आहे. समाजात सध्या लग्न जुळण्याच्या समस्या आहेत. अशा काळात असे वधू – वर मेळावे आयोजित करणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने मंडळाने घेतलेला पुढाकार निश्चितच कौतुकास्पद आहे. या माध्यमातून समाजही संघटीत होण्यास मदत होते. भंडारी मुळचे लढवय्ये,त् यांना सोबत घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमाराची उभारणी केली. भंडारी बांधवांनी प्राण पणाला लावून महाराजांची साथ केली. त्यापैकी महत्वाचे नाव म्हणजे मायनाक भंडारी होते. त्यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरमाराने अनेक पराक्रम केले. ब्रिटिशांनाही सडेतोड उत्तर देण्याची हिंमत भंडारी समाजात होती. भंडारी समाज विखुरलेल्या स्वरूपात आहे. आपली ताकद,पूर्वइतिहास हा समाज विसरत चालला आहे. भंडारी समाज पुन्हा एकसंघ कसा होईल, आपले गतवैभव आपल्याला कसे प्राप्त करता येईल याचा विचार व्हायला हवा.भंडारी समाज एवढा मोठा आहे की, इतर समाजालाही आधार देण्याची क्षमता या समाजामध्ये आहे. त्यामुळे आपल्यामधील मतभेद विसरून ज्योत ज्योतीने मशाल पेटवावी लागेल. अहंकार बाजूला ठेवून आपण पुढे गेले पाहिजे. भंडारी समाजाने आपली शक्ती जागृत करायला हवी आपल्याला जेव्हा आपल्या ताकदीची जाणीव होईल, तेव्हा सर्वांना हा समाज पुरून उरेल असे नाईक म्हणाले.

यावेळी संबोधीत करताना आमदार दीपक केसरकर म्हणाले की, भंडारी समाजाला गौरवशाली इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराजांपासून या समाजात अनेक लढवय्ये होऊन गेले. ब्रिटिशांच्या काळात भंडारी समाजाचे स्वतंत्र पोलीस दल होते. हा समाज सर्वांना बरोबर घेऊन जाणारा समाज आहे. या समाजाचे अनेक लोक माझे पदाधिकारी आहेत. मला या समाजाने नियमित साथ दिली आहे. त्यामुळे सावंतवाडी तालुका भंडारी मंडळ जे उपक्रम राबवित आहेत त्यात माझा सहभाग असणार आहे. मंडळाने वधू – वर मेळावा भरवून चांगला उपक्रम हाती घेतला आहे, असे स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. नवीनचंद्र बांदिवडेकर म्हणाले क भंडारी ज्ञातीतील युवकांना रोजगार प्राप्त होण्यासाठी लवकर मुंबईत भंडारी समाजातील उद्योजकांसोबत परिषद आयोजित करण्यात येणार आहे. त्या माध्यमातून युवकांना रोजगार देण्याचा हेतू आहे. समाजातील अनेकजण आज उद्योग व्यवसायात आहेत. आज तरुणांनीही उद्योजक होण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून नोकऱ्या देणारे बनावे असे त्यांनी आवाहन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसांलन प्रा.सुषमा मांजरेकर यांनी केले. स्वागत अध्यक्ष प्रसाद अरविंदेकर यांनी तर मान्यवरांचा परिचय प्रवीण मांजरेकर यांनी केला. मंडळाचे सहसचिव नामदेव साटेलकर यांनी प्रास्ताविक केले तल मंडळाच्या कार्याचा आढावा संजय पिळणकर यांनी घेतला. आभार उपाध्यक्ष बाळा आकेरकर यांनी मानले. या मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.जवळपास २२४ हून अधिक वधू वरांनी या मेळाव्याला नोंदणी केली.