सेवानिवृत्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी आणि ज्येष्ठ रंगकर्मी विजय चव्हाण व मान्यवरांची उपस्थिती.
मालवण | प्रतिनिधी : स्वातंत्र्यपूर्वकाळात म्हणजेच १२७ वर्षापूर्वी भंडारी ज्ञातीतील समाजबांधवानी एक एक रुपया गोळा करून भंडारी एज्युकेशन सोसायटीची स्थापना करीत शिक्षणाचे रोपटे लावले, त्या महान विभूतीना विसरून चालणार नाही. शिक्षण क्षेत्रात आज या शिक्षण संस्थेचा दबदबा असून भंडारी एज्युकेशन सोसायटी हा एक ब्रँड असल्याने विद्यार्थ्यांनी या संस्थेचे ब्रँड ऍम्बेसेडर बनून भंडारी एज्युकेशन सोसायटी यां ब्रँडचा नावलौकिक वाढवावा असे प्रतिपादन जिल्हा परिषद सिंधुदुर्गचे सेवानिवृत्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी आणि ज्येष्ठ रंगकर्मी विजय चव्हाण यांनी येथे बोलताना केले.
भंडारी एज्युकेशन सोसायटी (मालवण) मुंबई संचालित भंडारी ए. सो. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय मालवणचे वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण समारंभ गुरुवारी मालवण येथील मामा वरेरकर नाट्यगृहात संपन्न झाले. त्यावेळी विजय चव्हाण हे बोलत होते. यां कार्यक्रमाचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून आणि नटराज पूजन व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे विजय चव्हाण, मालवणचे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे, कार्यक्रमाचे अध्यक्ष भंडारी एज्युकेशन सोसायटीचे ऑनररी जनरल सेक्रेटरी साबाजी करलकर तसेच संस्थेचे जॉईंट सेक्रेटरी चंद्रकांत मयेकर, मुख्यकार्यकारी अधिकारी वामन खोत, जॉन नरोन्हा, दशरथ कवटकर, प्रकाश कुशे, मुख्याध्यापक हणमंत तिवले, प्रशालेची मुख्यमंत्री दिया गोलतकर, ज्युनिअर कॉलेज विद्यार्थीनी प्रतिनिधी भक्ती बेलोसे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी पर्यवेक्षक आर डी बनसोडे यांनी प्रास्ताविक केले तर मुख्याध्यापक हणमंत तिवले यांनी स्वागत केले.
यावेळी मार्गदर्शन करताना विजय चव्हाण म्हणाले, आपण आयुष्यात अनेक आव्हानांचा संकटाचा सामना करत शासकीय अधिकारी आणि एक रंगकर्मी बनलो. आयुष्यात अनेक अडचणी येतील, मात्र त्याबबत प्रश्न विचारत राहायचे नाही, तर त्या प्रश्नांची उत्तरे बनली पाहिजेत, तरच आपण यशस्वी होऊ शकतो काल किती कष्ट केलात त्याला महत्व नाही, आज आणि उद्या ही कष्ट करायचे आहेत तरच तुम्ही आयुष्यात पुढे जाल. सुर लावणे आणि स्वर लावणे या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. सुर लावणारा गायक बनतो, आणि ज्याला स्वर लावता येतो तो नट बनतो, सुर आणि स्वर हे दोन्ही ज्यांना लावता येतात ते माणूस बनतात, भंडारी हायस्कुलच्या विद्यार्थ्यांना स्वर आणि सुर दोन्ही लावता येतात, कारण शिक्षकांनी त्यांना तसे घडविले आहे, असेही विजय चव्हाण म्हणाले.
यावेळी पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे म्हणाले, विद्यार्थ्यांना योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी प्रोत्साहन दिले पाहिजे. शिक्षण घेत असतानाच भविष्यात काय करायचे आहे हे ठरविले पाहिजे, विद्यार्थ्यांनी ध्येय ठरवून वाटचाल केल्यास प्रगतीचा मार्ग गवसेल असेही श्री. कोल्हे म्हणाले.
यावेळी साबाजी करलकर यांनी शाळेचे शिक्षक विद्यार्थ्यांसाठी आणि शाळेच्या उन्नती साठी श्रम घेत आहेत, चांगले काम करत आहेत. विद्यार्थी देखील चांगले यश मिळवीत आहेत. माजी विद्यार्थ्यांची देखील शाळेला साथ लाभत आहे, भंडारी कनिष्ठ महाविद्यालयाचा सुवर्ण महोत्सव आनंदात व चांगल्या प्रकारे साजरा करू, असेही ते म्हणाले.
यावेळी वामन खोत प्रा. पवन बांदेकर यांची समयोचित भाषणे झाले . यावेळी विजय चव्हाण व प्रवीण कोल्हे यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच प्रशालेतील प्रत्येक इयत्तेमधील बेस्ट स्टुडंट आणि कनिष्ठ महाविद्यालयातील आदर्श विद्यार्थी पुरस्कार वितरित करण्यात आले. तसेच माजी विद्यार्थी युवा संघटनेकडून देण्यात येणारा स्व. रघुनाथ टेमकर स्मृति आदर्श विद्यार्थी पुरस्कार कौस्तुभ सोनवडेकर (इयत्ता नववी) या विद्यार्थ्याला प्रदान करण्यात आला. तसेच विविध स्पर्धा व क्रीडा प्रकारात यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रंथपाल प्रफुल्ल देसाई यांनी केले. तर आभार श्री. संदीप अवसरे यांनी मानले. पारितोषिक वितरण कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाले. तर २७ रोजी सकाळी ८. ३० वा. माध्यमिक विभाग आणि दुपारी २. ३० वा. प्राथमिक विभागाच्या विद्यार्थ्यांचे गुणदर्शनपर कार्यक्रम सादर होणार आहेत.