शिरगांव | प्रतिनिधी : देवगड तालुक्यातील कुवळे- रेंबवली ( सडेवाडी) येथील मोलमजुरी करणारे शेतकरी संतोष विठ्ठल खरात यांच्या ५ शेळ्या मृत पावल्या असून १ शेळी अत्यवस्थ आहे. शेतकरी संतोष खरात यांनी बुधवारी नेहमीप्रमाणे रानात चरायला सोडलेल्या शेळ्या सायंकाळी सुखरूप घरी आल्या. मात्र गुरुवारी व शुक्रवारी यातील त्यांच्या ५ शेळ्या मृत्युमुखी झाल्या. याबाबत वैद्यकीय अधिकाऱ्यानी सर्व लक्षणे पाहता या शेळ्यांनी बुधवारी रानात विषारी वनस्पती मोठ्या प्रमाणावर खाल्यामुळे त्यांना विषबाधा झाली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला. या मृत शेळ्या १ ते २ वर्षाच्या होत्या. यामध्ये एक बकरा , दुपत्या व गाभण अशा ४ शेळ्यांचा सामावेश आहे. अजून एक शेळी अत्यवस्थ आहे. या घटनेमुळे संतोष खरात यांचे सुमारे ५५ – ६० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. इतर ४ मोठ्या व ३ लहान शेळ्यांवर वेळीच औषधोपचार करण्यात आल्यामुळे त्यांना वाचविण्यात यश आले आहे.
शुक्रवारी कुवळे येथील पशुवैद्यकीय अधिकारी डाॅ. योगेश गोसावी यांनी मृत शेळ्यांची पाहणी करून शवविच्छेदन केले. यावेळी त्यानी विषारी वनस्पती खाऊन त्यांना विषबाधा झाली असावी असा प्राथमिक अंदाज त्यांनी व्यक्त केला. यावेळी विकास जेठे, अभिषेक कुबडे, संतोष खरात आदी उपस्थित होते. यावेळी शवविच्छेदनचा काही अंश पुणे येथे प्रयोगशाळेत अधिक निदान करण्यासाठी पाठविण्यात आला आहे.