मालवण | ब्यूरो न्यूज : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण झालेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा २६ ऑगस्ट रोजी कोसळला होता. राज्य सरकारने याठिकाणी ६० फुटी पुतळा उभारण्याचे काम ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार आणि त्यांचा मुलगा अनिल सुतार यांच्या कंपनीला दिले असल्याची माहिती समोर आली आहे. राम सुतार आर्ट क्रिएशन्स प्रा. लि. या कंपनीने याआधी गुजरातमधील ‘स्टॅट्यू ऑफ युनिटी’ या सरदार वल्लभभाई पटेलांच्या पुतळ्याचे काम पाहिले होते.
नौदल दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचे कौतुक करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील राजकोट किल्ल्यावर पुतळा उभारण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ४ डिसेंबर २०२३ रोजी मालवणमध्ये शिवरायांच्या पुतळ्याचे लोकार्पण केले होते. शिवपुतळा उभारण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून २० कोटी रुपयांची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली होती.