मसूरे | प्रतिनिधी : बॅ नाथ पै सेवांगण कट्टा येथे प्रा. मधु दंडवते यांचा १९ वा स्मृतिदिन साजरा करण्यात आला. या वेळी किशोर शिरोडकर यानी विद्यार्थ्याना प्रा मधु दंडवते यांच्या जीवन चरित्राची ओळख करून दिली. कोकण रेल्वेचे शिल्पकार असणारे प्रा. मधु दंडवते हे विद्यार्थीप्रिय प्राध्यापक होते. त्यांच्या व्याख्यानाला इतर कॉलेजचे विद्यार्थी सुद्धा बसायचे. अनेक वर्ष खासदार, भारताचे रेल्वेमंत्री, भारताचे अर्थमत्री व नियोजन मंडळाचे उपाध्यक्षपद ही सर्वोच्च पदे सांभाळताना त्यांनी कायमच सामान्य जनतेच्या हिताचे निर्णय घेतले अन् निष्कलंक चारित्र्याने भारतात एक आदर्श संसदपटू म्हणून नाव कमावले. अशा ऋषीतुल्य व्यक्तिमत्वाचा विचार घेऊनच सेवांगण काम करीत आहे. विद्यार्थ्यानी त्यांचे चरित्र अभ्यासावे असे आवाहन त्यांनी केले.
मनोज काळसेकर यानी विद्यार्थ्याना कोकण रेल्वे प्रा मधु दंडवते यांच्यामुळे साकार झाली. त्यांचे ऋण सर्वांनी लक्षात ठेवावे व आपल्या अभ्यासात प्रगती करुन आदर्श विद्यार्थी बनावे असे सांगितले. या कार्यक्रमास किशोर शिरोडकर, बापू तळावडेकर, दादा वंजारे, सौ जांभवडेकर, मनोज काळसेकर, श्रीधर गोंधळी व विद्यार्थी उपस्थित होते.