मालवण | ब्यूरो न्यूज : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांची पत्रकार परीषद संपन्न झाली यावेळी ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचा, बाळासाहेबांचा आशीर्वाद घेऊन या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार वैभव नाईक हे रिंगणात आहेत. उमेदवारीच्या रिंगणात उतरल्यानंतर विजय होणार हे निश्चितच आहे. समोरचा उमेदवार निलेश राणे यांचा पराभवही निश्चित आहे. परंतु आम्हाला या गोष्टीचा आनंद आहे की या दोन वर्षाच्या कालखंडामध्ये शिवसेना पक्षात फूट पाडण्यात आली. या फुटीनंतर अनेक आघात शिवसैनिकांवर करण्यात आले. आमचा धनुष्यबाण, नाव चोरणे असेल. आमच्या कार्यालयावर कब्जा मिळविण्याचा प्रयत्न झाला. कोर्टाचे अनेक ससेमिरे असतील. ही सर्व खदखद आमच्या मनामध्ये आहे. त्यामुळे सर्व शिवसैनिक एकदिलाने, एकमताने काम करत आहेत आणि विजय मिळविण्यासाठी सज्ज झाले आहेत असे ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
येथील ठाकरे शिवसेना कार्यालयात पत्रकार परिषद झाली. यावेळी मालवण शहरप्रमुख पृथ्वीराज उर्फ बाबी जोगी, दिपा शिंदे, सिद्धेश मांजरेकर, महेंद्र म्हाडगुत, मनोज मोंडकर, दीपक आंगणे, अक्षय रेवंडकर, जयदेव लोणे, राजू परब, निलेश कुडाळकर, तेजस लुडबे, महेश शिरपुटे, मोहन मराळ, सुरेश माडये किस्तु फर्नांडिस, दत्ता पोईपकर आदी उपस्थित होते.
श्री. खोबरेकर म्हणाले, आज विरोधकांना निश्चित सांगेन की आज मी या मतदारसंघांमध्ये फिरताना एक गोष्ट जाणवली की ते धनशक्तीचा वापर करताहेत. परंतु तुळशीसमोर, देवतांच्या मूर्तीवर हात ठेवून तुम्ही मत आम्हालाच देणार हे सांगा असे सांगितले जात आहे. असे करण्याची वेळ आज विरोधकांवर आली आहे. विरोधक हे हादरून गेले आहेत. विकासाच्या, व्हिजनच्या मुद्द्यावर बोलत नाही. गेले सहा वर्ष त्यांचे वडिल केंद्रात मंत्री असो, खासदार असो या मालवणतालुक्यासाठी, मतदार संघासाठी काय आणले हे सांगत नाहीत. तर केवळ हिंदू हा मुद्दा घेऊन चालत आहेत. कडवट हिंदू काय असतो हे बाळासाहेबांनी आम्हाला शिकविले आहे. त्याच हिंदुत्वाचा आम्ही लोकांमध्ये जाताना वापर करत आहोत. निष्ठावंत शिवसैनिक भाई गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत आहोत. हे काम करत असताना आमदार नाईक यांनी गेल्या पंधरा वर्षाच्या कालखंडामध्ये जनतेची सेवा करण्याचे काम केले. त्यामुळे आजचा जो प्रतिसाद आमदारांना मिळतोय तो त्याच पद्धतीचा मिळत आहे. परंतु समोरच्या उमेदवारांनी काय केले. राडे करण्याचे काम केले, आया बहिणीला लाज वाटेल अशा पद्धतीचे भर व्यासपीठावर वक्तव्य केले असे उमेदवार चालणार आहेत का असा प्रश्न आमचा मतदारांना आहे.
विरोधकांनी ज्या कामांची भूमीपूजने केली ती कामे सुरू झालेली नाहीत. आमदार नाईकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे, सर्वसामान्यांचे, गृहिणीचे जो जो घटक जिल्ह्याशी आणि या मतदार संघाशी निगडित आहे. यात वाळू, चिरेखाण व्यावसायिक असतील, मच्छीमारांचे प्रश्न त्यांनी सातत्याने मांडले आहेत. ते सोडविण्याचेही काम केले. विधिमंडळामध्ये प्रश्न मांडून या आयुधांचा वापर करत शासन निर्णयात बदल करून न्याय मिळवून देण्याचे काम केले. आज वेळोवेळी जाताना सुद्धा समुद्रात जाऊन जरी संघर्ष करावा लागला तर तो स्वतः वैभव नाईक यांनी त्या बोटीवर चढून त्या ठिकाणी केला आहे. समोरचे उमेदवार केवळ श्रेय घेण्याचे काम करत आहेत. एसीत बसून तेवल्गना करत आहेत की आम्ही मच्छीमारांचे प्रश्न सोडवतोय. परंतु एसीत बसून हे प्रश्न सुटत नाहीत तर त्यासाठी स्वतः रणांगणात उतरावे लागते. मच्छीमार, शेतकरी, आंबा बागायतदार यांचे प्रश्न जाणून घेऊन ते सोडविण्याचे काम नाईकांनी केले. तोक्ते वादळाच्या वेळी आमदार नाईकांनी स्वतः रस्त्यावर उतरून लोकांसाठी काम केले. यावेळी विरोधक कोणीही दिसले नाही. केंद्र शासनाचा एक रुपयाचा निधी ते उपलब्ध करून देऊ शकले नाहीत ही वस्तुस्थिती आहे. फयान वादळाच्या वेळी साडे चार कोटी रुपये मच्छीमारांना मंजूर झाले होते. त्यावेळी हेच नारायण राणे राज्याचे पुनर्वसन मंत्री होते. परंतु ते असलेल्या अटी शिथिल करू शकले नाहीत. परिणामी साडे चार कोटी रुपये पुनश्च एकदा सरकार दरबारी जमा झाले.
एनसीडी धारकांच्या घरावर बँकां जप्ती घालण्यासाठी जात आहेत. परंतु गेल्या पाच सहा वर्षाच्या कालखंडामध्ये हा प्रश्न एकदाही राणेंनी सभागृहामध्ये मांडला नाही ही वस्तुस्थिती आहे आहि टीकाही श्री. खोबरेकर यांनी केली.
शेतकऱ्यांना विविध पद्धतीने न्याय मिळाला पाहिजे यासाठी सातत्याने मग पिक विमा योजनेचे पैसे असतील अन्य पैसे असतील यासाठी आमदारांनी प्रयत्न केला. परंतु निलेश राणे, नारायण राणे यांच्याकडून कोणतेही काम झाले नाही. त्यामुळे पुन्हा एकदा विधानसभेमध्ये आपल्या हक्काचा वैभव नाईक दिसला पाहिजे. जे पक्षाशी एकनिष्ठ राहिले त्यांच्या पाठीशी राहायला पाहिजे असे जनतेने ठरविले आहे. मागील निवडणुकीत जेव्हा रणजीत देसाई उभे होते. तेव्हा त्यांना राणे पिता, पुत्राची साथ नव्हती. मात्र आज मुलगा रिंगणात असताना ते मतांसाठी दारोदारी फिरत आहेत. त्यामुळे फक्त राणे कुटुंब आपली मुलं, आपण, आपला परिवार, आपली नातवंड याच्यासाठी काम करत आहेत आणि याउलट आमदार वैभव नाईक आपली जनता, सर्वसामान्य घटक, मच्छीमार, शेतकरी बांधव, वाळू, आंबाव्यावसायिक या सगळ्यांसाठी काम करताना सर्व घटकांसाठी काम करताना दिसत आहेत. त्यामुळे या मालवण कुडाळच्या मतदार संघाने वैभव नाईक यांच्या मशाल निशाणीवर भरघोस मतदान करण्याचे निश्चित केले आहे. आमदार नाईक यांना जास्तीत जास्त मताधिक्याने विजयी करत त्यांना पुन्हा एकदा विधानसभेवर पाठवण्यासाठी सर्व लोक या ठिकाणी सज्ज झाले आहेत. येणाऱ्या २३ तारीखला विजयाचा गुलाल उधळण्यासाठी आम्ही सज्ज झालो आहोत. माझे सर्व शिवसैनिकांना आवाहन आहे की हीच वेळ आहे. जो न्याय न्यायालयात मिळाला नाही तो मिळवण्याची. जनतेच्या कोर्टात जाण्याची हीच वेळ आहे. गद्दारांना धडा शिकविण्यासाठी सर्व कार्यकर्ते सज्ज झाले आहेत. विरोधकांकडून गैरसमज पसरविण्याचे काम सुरू आहे. मात्र आमचे कार्यकर्ते विचलित न होता एकदिलाने, एक विचाराने विजयाची हॅट्रिक करण्यासाठी सज्ज झाले आहेत असेही स्पष्ट केले.