निलेश राणे लोकांच्या प्रश्नावर बोलतात, तर उबाठाकडून फक्त ‘मेरा नाम जोकरचे’ शो लावत टाइमपास चाललाय : शिवसेना जिल्हा प्रवक्ते रत्नाकर जोशी यांची टीका.
प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्हा हा विचारवंत मतदारांचा जिल्हा आहे, जिल्ह्यात येताना विकासाचे मुद्दे घेऊन या. त्यावर बोलायची तयारी ठेवा. उगाचच तोंड वाजवत फिरणारे कोळी आणि विदूषकांची टोळी घेऊन बिनकामी सर्कस कशाला? जनतेपुढचे प्रश्न गंभीर आहेत. त्यात कुडाळ मालवणच्या विकासाचा तब्बल १० वर्षांचा बॅकलॉग आहे, अगदी आजही, अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांवरच्या आर्थिक संकटाचा प्रश्न आहे.
जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रसंगी स्वतःच्या खिशात हात घालून अडचणीतल्या माणसाच्या पाठीवर आधाराचा हात ठेवणारे निलेश राणेंसारख्याच नेतृत्वाची आज गरज आहे. फक्त राणेंविरोधात टीका करण्यासाठी टुरिंग सर्कस सिंधुदुर्गात आणणारा इथला “मेरा नाम जोकर” आता माघारी पाठवायची वेळ आली आहे. आपल्या विदूषकांच्या टोळीचे खेळ त्यांनी आता थांबवावेत, त्यापेक्षा हिम्मत असेल तर विकासावर बोलण्यासाठी उबाठाला घेऊन पुढे यावे, असे आव्हान शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा प्रवक्ते रत्नाकर जोशी यांनी दिले आहे.