३७ वर्षांच्या सेवाभावी कारकिर्दीची मान्यवरांनी केली प्रशंसा.
मसुरे | प्रतिनिधी : जिल्हा परिषद शिक्षण सेवेतून गेली सदतीस वर्षे प्रामाणिकपणे काम केल्याची पोचपावती मला आजच्या या सत्काराने मिळालेली आहे. शिक्षण विभागात मी केलेल्या कामाचे आज खऱ्या अर्थाने सोने झाले आहे. आज पर्यंत काम केलेल्या सर्वच शाळा मी यशोशिखरावरती नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. यात मी सफल सुद्धा झाले. यासाठी मला नेहमी साथ देणाऱ्या सर्वांचे मी या ठिकाणी ऋण व्यक्त करते. तसेच जिल्हा परिषद प्रशासनाने जो आज मानसन्मान केला याबद्दल सुद्धा मी त्यांचे आभार व्यक्त करते. तसेच मला माझ्या परिवाराने सुद्धा जी साथ दिली आहे आणि यामुळेच मी माझी ही सेवा यशस्वी करू शकले असे प्रतिपादन सिंधुदुर्ग नगरी येथे शिवाजी महाराज सभागृह येथे सत्कारास उत्तर देताना निवृत्त मुख्याध्यापिका सौ विनया विजय सातार्डेकर यांनी केले. नियत वयोमानानुसार आदर्श शाळा जोशी विद्यामंदिर जामसंडे नं १ सेवानिवृत्त उच्च श्रेणी मुख्याध्यापिका श्रीमती विनया विजय सातार्डेकर या सेवानिवृत्त झाल्या. त्यांनी केलेल्या आजवरच्या कार्याची तसेच शैक्षणिक योगदानाबद्दल दखल घेऊन सिंधुदुर्ग जिल्हा परिषद च्या वतीने सत्कार मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. या वेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन किशोर काळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्राप विभाग श्री. विशाल तनपुरे, प्राथमिक शिक्षणाधिकारी गणपती कमळकर, उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री पाटील साहेब, कक्ष अधिकारी श्री दत्ता गायकवाड, अधीक्षक श्री विठोबा परब, रवींद्र मोडकर, कनिष्ठ सहाय्यक हरेश तोरस्कर, शमिका घाडीगावकर, भाग्यश्री पूरळकर, शरद नारकर, विजय सातार्डेकर, हर्षल सातार्डेकर, दीपक पेडणेकर आदी उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते सेवानिवृत्त मुख्याध्यापिका विनया सातार्डेकर मॅडम यांचा शाल शिफळ पुष्पगुच्छ सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी बोलताना उप मुख्य कार्यकारी अधिकारी किशोर काळे म्हणाले विनया सातार्डेकर मॅडम यांनी शिक्षण विभागात गेली सदतीस वर्षे प्रामाणिक सेवा केली अनेक शैक्षणिक उपक्रम राबवून त्यांनी आपण कार्यरत असणाऱ्या शाळा यशोशिखरावरती नेल्यात आणि हे करत असताना निष्कलंक अशी प्रामाणिक सेवा करून त्यांनी शिक्षण क्षेत्रात एक आदर्श निर्माण केला आहे. विनया सातार्डेकर यांचे शिक्षण क्षेत्रातील योगदान खरोखरच कौतुकास्पद आहे. श्रीमती सातार्डेकर मॅडम यांच्यासारखी रत्ने शिक्षण क्षेत्रातील जिल्हा परिषदेची खऱ्या अर्थाने शान होत्या. यावेळी विनया सातार्डेकर मॅडम यांनी या वेळी आपल्या उपस्थित परिवाराचे तसेच शिक्षण विभागातील सर्व आजी – माजी अधिकारी वर्ग,प्रशालेतील सहकारी शिक्षक, विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ या सर्वांचे आभार व्यक्त केले.