बांदा | राकेश परब : वाचनामुळे स्मरणशक्ती, मनाची एकाग्रता वाढते. पुस्तकच माणसाला समृद्ध करतात. राजमाता जिजाऊने बाल शिवाजीला पराक्रमाच्या गोष्टी सांगून त्याच्या शौर्याला आकार दिला होता. एखादे पुस्तक, पुस्तकातले पान आयुष्य बदलवते. एक वाक्य आयुष्याचे धेय ठरू शकते. एवढी ताकद वाचनात आहे. रामायण, महाभारत, भगवतगीता, पंचतंत्र यांतून भारतीय जीवनमूल्य प्रतिबिंबित होतात. यासाठी मुलांना वाचनाची गोडी लागण्यासाठी छोट्या पुस्तकांपासून सुरुवात करावी. शालेय दशेतच विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण केल्यास भविष्यात तो विद्यार्थी प्रतिभावान व सर्वगुणसंपन्न होऊ शकतो असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत अनंत भाटे यांनी येथे केले.
वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून येथील जिल्हा परिषद केंद्रशाळा नं. १ मध्ये आयोजित कार्यक्रमात श्री भाटे बोलत होते. यावेळी बांदा नट वाचनालय आयोजित व शैलेश लाड मित्रमंडळ पुरस्कृत शालेय रंगभरण व चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या उपस्थितीत पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर वाचनालयाचे अध्यक्ष एस. आर. सावंत, उपाध्यक्ष निलेश मोरजकर, कार्यवाह राकेश केसरकर, संचालिका सौ. स्वप्नीता सावंत, लाड मित्रमंडळाचे सचिव संदीप नार्वेकर, अंकुश माजगावकर, मराठी भाषा समन्वयक सौ. परब, मुख्याध्यापक शांताराम असनकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी दीपप्रज्वलन करून व डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी पहिली ते चौथी गटासाठी घेण्यात आलेल्या रंगभरण स्पर्धेतील अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक विजेते शरण्या वायंगणकर, समर्थ पाटील, जागृती शिंदे यांना तसेच विहान गवस, रिया गवस यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.
पाचवी ते सातवी गटासाठी घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेतील अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक विजेते स्वामिनी तर्पे, अदिती सावंत, मनोज मिशाळ तसेच अंकिता झोन व रोशनी बोरपटे यांना उत्तेजनार्थ क्रमांक देण्यात आला. सर्व विजेत्यांना रोख पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक जे. डी. पाटील यांनी केले. आभार राकेश केसरकर यांनी मानले. यावेळी ग्रंथपाल सुस्मिता नाईक, सहाय्यक ग्रंथपाल सुनील नातू, ओंकार राऊळ, अमिता परब, यश माधव, प्रवीण परब यांच्यासह शिक्षक उपस्थित होते.