रेवतळेकर रापणसंघ, जुने गांववाले धुरीवाडकर रापण संघ, रामा मणचेकर रापणसंघ, सांताक्रूझ रापणसंघ, न्यू रापणसंघ, महेश हडकर रापणसंघांच्या मालकांचे निवेदन.
मालवण | प्रतिनिधी : मालवण शहरातील चिवला बीच येथे अनुक्रमे रेवतळेकर रापणसंघ, जुने गांववाले धुरीवाडकर रापण संघ, रामा मणचेकर रापणसंघ, सांताक्रूझ रापणसंघ, न्यू रापणसंघ, महेश हडकर रापणसंघ यांनी मालवण तहसीलदार वर्षा झाल्टे व मत्स्य विभागाला एक लेखी निवेदन दिले. या निवेदनात रापण संघांच्या वतीने सांगण्यात आले आहे की, रापण मच्छिमारी करताना, चिवला बीच समोरील कचेरी नजिकच्या समुद्रात दिनांक १ ऑक्टोबर पासून आमची जाळी फाटून तीव्र नुकसान होऊ लागले. तिथे एखादी लाकुड सदृश्य वस्तू किंवा एखादा नौकेचा नांगर असल्याची शक्यता आहे. यानंतर प्रसार माध्यमांनी याची दखल घेतली व त्याद्वारे आम्ही प्रशासन व स्थानिक स्कुबा डायविंग जलतरण तज्ञांना मदतीसाठी आवाहन केले. त्याप्रमाणे दांडी व धुरीवाडा येथील स्थानिक स्कुबा डायविंग तज्ञांनी दोन वेळा येऊन शोधकार्य केले परंतु काही निष्पन्न झाले नाही. यानंतर ९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी रापण लावल्यानंतर जाळे ओढताना त्यामध्ये एक लाकूड मिळाले असून ते प्रोसेस्ड बांबूचे असावे असा आमचा कयास आहे. काही काळापूर्वी चिवला बीच वरील पर्यटकांसाठीचे लाकडी मचाण ( गाझिगो टेंट) कोसळून ते त्यांच्या सिमेंटच्या फाऊंडेशनसह समुद्रात वाहून जात वाळूत रुतल्याची आम्हाला शक्यता वाटते. तरी याची दखल घेत संपूर्ण रितसर चौकशी करावी व आमच्या सर्व रापणसंघांच्या जाळ्यांच्ये नुकसानीचा पंचनामा करावा म्हणून आम्ही चिवला बिच येथील सहा रापणसंघांचे मालक हे निवेदन देत आहोत असे निवेदनात नमूद केले आहे.
यावेळी रापणसंघांचे गुरू मणचेकर, अंतोन कैतान मेंडिस, दाजी जोशी, महेश हडकर व चिवला बीचवरील रापणसंघांचे सदस्य उपस्थित होते.