मसुरे | प्रतिनिधी : राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे, महाराष्ट्र मार्फत आयोजित दर्जेदार व्हिडिओ निर्मिती स्पर्धा – २०२३ मध्ये श्री भगवती हायस्कूल मुणगेचे शिक्षक श्री. प्रसाद बागवे यांनी तालुका स्तरावर तृतीय क्रमांक प्राप्त करत यश संपादन केले. त्याबद्दल मुणगे परिसरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
बदलत्या शिक्षण व्यवस्थेमध्ये शिक्षकांमध्ये निकोप स्पर्धा पार पाडण्यासाठी ई – साहित्य निर्मिती करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सर्व माध्यमाच्या, सर्व व्यवस्थापनाच्या शाळां मधील शिक्षकांसाठी ही स्पर्धा गेल्या वर्षी आयोजित केली होती. या स्पर्धेसाठी अनेक शिक्षक यामध्ये सहभागी झालेले होते. श्री बागवे यांनी इयत्ता नववी ते दहावी या गटासाठी शैक्षणिक साहित्य निर्मिती केली होती. त्यामध्ये देवगड तालुक्यातून तृतीय क्रमांक प्राप्त झाला आहे. यानिमित्त शाळेच्या मुख्याध्यापक श्रीम. मोनिका कुंज, सर्व शिक्षक वर्ग यांनी त्यांचे अभिनंदन केले.