मसुरे | प्रतिनिधी : मालवण मसुरे मर्डेवाडी येथील श्री विठ्ठल मंदिर येथील हरिनाम सप्ताहाची सांगता मोठ्या उत्साहात झाली. गेले आठ दिवस मंदिर परिसर हरिनामात रंगून गेला होता. ‘विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, हरी ओम विठ्ठला’ असा जयघोष आणि मंदिर परिसरात केलेली नेत्रदीपक विद्युत रोषणाई यामुळे मंदिर परिसर झळाळून गेला होता. हरिनाम सप्ताहात पंचक्रोशीतील भजनी मेळ्या सह त्रिंबक, चिंदर, मालोड, बेलाचिवाडी, बांदिवडे, आडवली, असगणी, चांदेर येथील भजनी मेळ्यानी आपली सेवा दिली.
मसुरे टोकळवाडी मंडळाच्या गोफ नृत्याने रंगत आणली. हरिनाम सप्ताहात अखेरच्या दोन दिवसात सादर करण्यात आलेल्या दिंड्या मुख्य आकर्षण ठरल्या. मसुरे टोकळवाडी मंडळाचा ‘शिव आराधना’, मसुरे मर्डेवाडी मंडळाचा ‘ शेगावीचे गजानन महाराज’, आणि मसुरे गडघेरावाडी मंडळाचा ‘संत गोरा कुंभार ‘ आदी देखावे साकारण्यात आले. हरिनाम सप्ताहात सादर केलेल्या देखाव्या सोबत फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालाची उधळण करण्यात आली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री विठ्ठल मंदिर ट्रस्ट पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्ते, ग्रामस्थ यांनी मेहनत घेतली.