आक्रमक क्रिकेटपटू म्हणून परिचीत सुनील दुखंडे यांच्या निधनाने शोकाचे वातावरण.
मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मसुरे मागवणे सुनील सिताराम दुखंडे ( वय : ४४ वर्षे )यांचे मुंबई येथे नुकतेच आकस्मिक निधन झाले. सुनील यांच्या निधनाने मसुरे परिसर, सिंधुदुर्ग जिल्हा आणि मुंबई येथून शोक व्यक्त होत आहे.
सुनील दुखंडे याचे सिंधुदुर्गच्या टेनिस क्रिकेटमध्ये मोठे योगदान होते. सिक्सर किंग म्हणून टेनिस क्रिकेटमध्ये त्याची ओळख होती. जिल्हा आणि जिल्ह्याबाहेरील नामवंत संघांमध्ये सुनील याची निवड झाली होती. गोवा राज्यातील अनेक नामवंत संघामध्ये सुनील याने आपल्या खेळाची चुणूक दाखवली होती. मसुरे येथे सामाजिक, कला, क्रीडा तसेच धार्मिक क्षेत्रातही त्याचा मोठा वाटा होता. अनेक युवा क्रिकेटपटू घडविण्यातही सुनील याचे योगदान मोठे होते. शांत आणि मैत्रीपूर्ण स्वभावामुळे सर्वांशी त्याचे सलोख्याचे संबंध होते.
त्याच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, वडिल, दोन बहिणी, काका, काकी, भावोजी, सासू – सासरे, चुलत भाऊ असा मोठा परिवार आहे. मसुरे येथील महेश वंजारे यांचे ते मेहुणे, मागवणे येथील आशा स्वयंसेविका मीना वंजारे याचे ते भाऊ तर मुंबई मालाड येथील युवा नेते सुरेश मापारी यांचा तो मामेभाऊ, मागवणे पोलीस पाटील अभी दुखंडे यांचे ते चुलत भाऊ होत.