विठ्ठलवाडी मित्रमंडळ, विजयदुर्ग तसेच प्रेरणोत्सव समिती विजयदुर्ग, शिवप्रेमी धोपटेवाडी ग्रामस्थ जामसंडे यांचा सहभाग.
शिरगांव | संतोष साळसकर : देवगड तालुक्यातील किल्ले विजयदुर्गच्या वारसा स्थळांच्या यादीत समावेशा संदर्भात नामांकन झाल्याने किल्ल्याच्या स्वच्छतेसाठी अनेक हात एकवटले. काल विजयदुर्ग विठ्ठलवाडी मित्रमंडळ, विजयदुर्ग तसेच प्रेरणोत्सव समिती आणि शिवप्रेमी धोपटेवाडी ग्रामस्थ, जामसंडेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी विजयदुर्ग किल्ल्याची साफसफाई केली.
विजयदुर्गचे सरपंच रियाज काझ़ी, विजयदुर्ग किल्ले विजयदुर्ग प्रेरणोत्सव समितीचे अध्यक्ष प्रसाद देवधर तसेच, विठ्ठलवाडी मित्रमंडळाचे अध्यक्ष संजय सावंत, धोपटेवाडी ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष विजय धोपटे यांच्या मार्गदर्शनाखाली असंख्य कार्यकर्त्यांनी किल्ले विजयदुर्गचे बुरुज तसेच झाडे झुडपे सफाई केली.
जागतिक वारसा स्थळात नामांकन मिळालेल्या विजयदुर्ग किल्ल्याची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी युनेस्कोची टिम ६ ऑक्टोबर रोजी विजयदुर्ग येथे येणार आहे. विजयदुर्गची निवड जागतिक वारसा स्थळात होण्यासाठी संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक संघटना, शिवप्रेमी दरदिवशी किल्ले विजयदुर्ग येथे स्वच्छता मोहीमेत सहभागी होण्यासाठी येत आहेत. ५ ऑक्टोबर पर्यंत ही मोहीम सातत्याने राबविण्यात येत आहे.