पालकमंत्र्यांच्या जनता दरबारात जलजीवन मिशन कमिटीच्या सदस्यांसह ग्रामस्थांनी घेतली मंत्री रवींद्र चव्हाण व मंत्री दिपक केसरकरांची भेट.
मळगांव | नितीन गावडे : सिंधुदुर्ग जिल्हा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सिंधुदुर्गनगरी ( ओरोस ) येथे भरवलेल्या जनता दरबारात सावंतवाडी तालुक्यातील मळगांव गावचा पाणी प्रश्न घेऊन जलजीवन मिशन कमिटीच्या सदस्यांसह ग्रामस्थांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण तसेचं मंत्री दिपक केसरकर यांची भेट घेऊन गावात निर्माण होणाऱ्या भीषण पाणी टंचाई बाबत चर्चा केली. याबाबत मळगांव चे माजी सरपंच गणेशप्रसाद पेडणेकर, विलास मळगांवकर, निलकंठ बुगडे, रुपेश सावंत आदींनी जनता दरबारात ग्रामस्थांच्या वतीने पालकमंत्र्यांना सह्यांचे निवेदन देऊन मळगांव गावात लघु धरणाची मागणी केली. पालकमंत्र्यांनी याची दखल घेत जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबतचा प्रस्ताव सादर करण्यास सांगितले.
यापुर्वी तिलारी धरणाचे पाणी मळगांव मध्ये आणण्यासाठी मळगांवातील जलजीवन मिशन कमिटीने स्थानिक आमदार तथा मंत्री दिपक केसरकर यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यामध्ये पांडुरंग राऊळ, बाप्पा नाटेकर, महेंद्र पेडणेकर, महेश शिरोडकर, सिंद्धेश आजगांवकर, निखिल राऊळ यांच्यासह ग्रामस्थांनी मंत्री केसरकर यांची भेट घेऊन मळगावचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी विनंती केली होती. मंत्री केसरकरांनी तिलारीचे पाणी मळगांवात आणण्यासाठी आठ कोटींची तरतूद करुन लवकरच ही पाईपलाईन टाकण्यात येईल असे सांगितले होते. मळगांव गावांत उन्हाळ्यात भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असल्याने या प्रश्नाला गांभीर्याने घेऊन लवकरात लवकर हा प्रश्न सोडविण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली.