मालवण सागरी महामार्गावर महसूल विभागाच्या पथकाची कारवाई…!
मालवण | प्रतिनिधी : मालवण तहसीलदार वर्षा झाल्टे यांनी बेकायदेशीर वाळू उत्खनन व वाहतूक रोखण्यासाठी खास पथकांची पुन्हा नियुक्ती केली आहे. या पथकातील नायब तहसीलदार श्रद्धा चौगुले यांच्या पथकाने मालवण सागरी महामार्ग याठिकाणी दोन ब्रास वाळुची वाहतूक होत असताना एक डंपर पकडून तो तहसील कार्यालयात जप्त करून ठेवला आहे. कुडाळ येथील सुजीतकुमार सिंग याच्या ताब्यातील हा डंपर असून त्याच्यावर सायंकाळी उशिरा दंडात्मक कारवाई करण्यात येत होती. हा डंपर सोमवारी सायंकाळी पकडण्यात आला आहे. महसूल विभागाकडून कारवाई होत असल्याची माहिती लागताच सागरी महामार्गावर डंपर वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आलेली होती. अचानक पणे महसूल विभाग आक्रमक बनल्यावर वाळू माफियांचे धाबे दणाणले.
गेले अनेक दिवस तालुक्यात बेकायदेशीर वाळू वाहतूक सुरु असल्याची तक्रार वाढल्याने महसूल विभागाकडून सोमवारपासून आक्रमक भूमीका घेण्यात आली. नायब तहसीलदार चौगुले यांच्या पथकाकडून करण्यात येत असलेल्या तपासणीत, सागरी महामार्ग याठिकाणी एक डंपर वाळूची वाहतूक करताना सापडून आला. त्याच्याकडे वाळू वाहतूक पासाची मागणी केली असता प्स सापडून आला नाही. डंपर क्रमांक (एमएन – ०७- सी – ५८९०) का जप्त करून तहसील कार्यालयात ठेवण्यात आला आहे. या कारवाईची माहिती मिळताच तहसीलदार वर्षा झाल्टे यांनी पुढीलकारवाईच्या सूचना केल्या. या कारवाईत मंडल अधिकारी पिटर लोबो, तलाठी गौरव दळवी, पेंडूर तलाठी आणेराव तसेच इतर अधिकारी सहभागी झाले होते.
वाळू लिलाव न झालेल्या खाडीपात्रात वाळू उत्खनन होत असल्यास त्याठिकाणी महसूल विभाग पथकाकडून कारवाई करण्यात येणार आहे. वारंवार सूचना करुनही बेकायदेशीर वाहतूक व उत्खनन सुरु असल्यास महसूल विभागाच्या पथकांना धडक कारवाई करायचे निर्देश देण्यात आले आहेत. सध्या सर्वत्र २४ तास पथकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ह्या पथकांना पोलीस बंदोबस्तही देण्यात आलेला आहे असे महसूल विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.