मुंबई | ब्युरो न्यूज : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने कर्मचाऱ्यांसाठी आजीवन पेन्शन योजना जाहीर केली आहे. यावर्षी बँकेला ६१५ कोटींचा निव्वळ नफा झाला आहे. यंदा कर्मचाऱ्यांना दहा टक्के लाभांश जाहीर केला आहे, अशी माहिती राज्य बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी दिली. राज्य सहकारी बँकेची ११३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा बँकेच्या मुंबई येथील मुख्य कार्यालयात १९ सप्टेंबर रोजी पार पडली. या वेळी माजी खासदार आनंदराव अडसूळ, बँकेचे व्यवस्थापकीय संचालक दिलीप दिघे, सरव्यवस्थापक आनंद भुईभार आदी उपस्थित होते.
देशात प्रथमच राज्य सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांसाठी आजीवन उदरनिर्वाह (पेन्शन) योजना जाहीर करण्यात आली. या योजनेस बँक कर्मचारी संघटनेचे निवृत्त संघटक सचिव धर्मराज मुंडे यांचे नाव देण्यात आले आहे. या योजनेंतर्गत सध्या कार्यरत असलेल्या ५०७ कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर दरमहा दहा हजार रुपये इतकी रक्कम पेन्शन स्वरूपात आजीवन मिळणार आहे. या योजनेसाठी लागणारी सर्व गुंतवणूक बँकेने केली आहे, हे या योजनेचे वैशिष्ट्य आहे. या निर्णयाबद्दल कर्मचाऱ्यांकडून प्रशासक विद्याधर अनास्कर यांचे कौतुक होत आहे.
या वेळी बँकेचे ग्राहक व उदयोन्मुख उद्योजक गजलक्ष्मी कास्टिंग प्रा. लि. पुणे यांच्या संचालिका अश्मिरा स्वरा आणि अनुराधा गोडसे यांना बँकेच्यावतीने गौरविण्यात आले.
राज्य बँकेचे नक्त मूल्य आजमितीस देशातील सर्व सहकारी बँकांमध्ये जास्त आहे. राज्य बँकेने मागील आर्थिक वर्षात ६०९ कोटींचा निव्वळ नफा कमावला होता. यावर्षी बँकेला ६१५ कोटींचा निव्वळ नफा झाला असून, त्यामध्ये शासनाकडून थकहमीपोटी प्राप्त झालेल्या कोणत्याही रकमांचा समावेश नाही. यंदाच्या आर्थिक वर्षात बँकेने मिळविलेल्या भरीव नफ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने शिफारस केलेल्या १० टक्के लाभांशास सभेने बहुमताने मान्यता दिली.
बँकेची वैधानिक गंगाजळी व भाग भांडवल मिळून मार्चअखेर बँकेचा स्वनिधी सहा हजार ५३० कोटी रुपये झाला आहे. रिझर्व्ह बँकेच्या निकषानुसार बँकांना भांडवल पर्याप्तता प्रमाण किमान ९ टक्के राखणे आवश्यक आहे. राज्य बँकेने मात्र हे प्रमाण १६.३४ टक्के इतके राखल्याने राज्य बँकेची नफा क्षमता वाढल्याचे दिसून येते. भांडवल पर्याप्तता प्रमाण ८१.५० टक्के इतके आहे. बँकेच्या ठेवीमध्ये चार हजार ९६९ कोटींनी वाढ झाली असून, ३१ मार्चअखेर बँकेच्या एकूण ठेवी २३ हजार ५८३ कोटी रुपये आहेत. बँकेस गेली १२ वर्षे लेखापरीक्षणामध्ये सतत `अ’ ऑडिट वर्ग प्राप्त होत आहे. मागील १० वर्षांपासून बँक सभासदांना १० टक्के इतका लाभांश देत आहे, असे बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी सांगितले.