बाप्पाच्या कृपाशिर्वादाला कृतज्ञतेने वंदन करत साश्रू नयनांनी दिला गेला भक्तीपूर्ण वातावरणात निरोप.
मळगांव | नितीन गावडे : गेले अकरा दिवस मोठ्या भक्तिभावाने गणरायाची सेवा केल्यानंतर अखेर काल विसर्जनाचा तो दिवस आला आणि,” गणपती बाप्पा गेले गावाला, चैन पडेना आम्हाला” असे म्हणत असताना पाणावलेले डोळे, यावर्षीच्या घरगुती बाप्पांची अखेरची आरती, बाप्पाला घातलेले गाऱ्हाणे , त्यानंतर वाजतगाजत ढोलताशांच्या गजरात काढलेली बाप्पांची मिरवणूक, शेतातील पायवाटेने गणेश विसर्जन कोंडजवळ नेऊन भक्तीमय वातावरणात, फटाक्यांच्या आतषबाजीत साश्रू नयनांनी अकरा दिवसांच्या गणपती बाप्पांना निरोप देण्यात आला.
सिंधुदुर्गात यंदा २०२४ साली परंपरेप्रमाणे श्री गणेशोत्सव मोठा उत्सवात साजरा करण्यात आला. यंदा पावसाची रिमझिम सुरू असली तरी अखेरच्या दिवशी मात्र पावसाने बऱ्यापैकी विश्रांती घेतली होती त्यामुळे गणेश भक्तांना मोठा दिलासा मिळाला. गेले अकरा दिवस भजन, फुगडी, पूजाअर्चा यामुळे सगळीकडे मोठा उत्साह निर्माण झाला होता. गणरायांच्या येण्याने लहान थोरांना प्रचंड आनंद झाला मात्र विसर्जन सोहळ्यात बाप्पांना निरोप देताना सर्वांचेचं डोळे पाणावले व पुढच्या वर्षी बाप्पा लवकर येण्याची आस लागली होती.