७० वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या सर्व नागरिकांना आयुष्मान भारत पीएम जन आरोग्य योजना (PMJAY) अंतर्गत मिळणार मोफत उपचार.
ज्येष्ठ नागरीकांसाठी पी एम आयुष्मान कार्ड कुठे व कसे मिळेल याची माहीती झाली उपलब्ध.
ब्यूरो न्यूज | नवी दिल्ली : हरियाणा आणि जम्मू – काश्मीरमधील विधानसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकारने देशातील ६ कोटी ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठी घोषणा केली आहे. आता देशातील ७० वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या सर्व नागरिकांना आयुष्मान भारत पीएम जन आरोग्य योजना (PMJAY) अंतर्गत मोफत उपचार मिळणार आहेत. या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना ५ लाख रुपयांपर्यंतच्या उपचारासाठी पैसे द्यावे लागणार नाहीत.
आधीच कव्हर केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना अतिरिक्त लाभ मिळेल.
दरम्यान, बुधवारी (११ सप्टेंबर) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या आराखड्याला मंजुरी देण्यात आली आहे. जी कुटुंबे आयुष्मान भारत पीएम जन आरोग्य योजनेअंतर्गत आधीच समाविष्ट आहेत, अशा कुटुंबांतील ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा अतिरिक्त लाभ मिळेल. म्हणजेच त्या घरांतील ज्येष्ठ नागरिकांना 5 लाख रुपयांपर्यंतचे टॉप अप कव्हरेज दिले जाईल. देशातील साडेचार कोटी कुटुंबे आता नव्याने या योजनेत समाविष्ट होतील. तुम्ही घरबसल्या या योजनेसाठी तुमचे कार्ड बनवू शकता.
आयुष्मान भारत पीएम जन आरोग्य योजनेसाठी अर्ज करण्याचे अनेक मार्ग.
PMJAY साठी अर्ज करण्याचे अनेक मार्ग आहेत, याशिवाय कार्ड बनवण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या हॉस्पिटल किंवा आयुष्मान केंद्राशी संपर्क साधू शकता. जिथे नोंदणी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर कार्ड बनवता येईल. कार्ड बनवण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड आणि फोटो लागेल. ग्रामीण भागात राहणारे लोक ग्राम रोजगार सहाय्यक किंवा प्रभाग प्रभारी यांच्या मदतीने बनवलेले आयुष्मान कार्ड मिळवू शकतात.
PMJAY साठी अर्ज कसा करावा?
तुमच्या मोबाईलवर गुगल प्ले स्टोअरवरुन आयुष्मान ॲप डाउनलोड करा. डाऊनलोड केल्यानंतर मोबाईल नंबर टाकून लॉग इन करा. लॉगिन केल्यानंतर, त्यात तुमची पात्रता तपासा. नवीन मंजुरीनंतर ७० वर्षे किंवा त्याहून अधिक वय वर्ष असणाऱ्या कोणत्याही उत्पन्न गटातील लोक यासाठी पात्र आहेत.
त्यानंतर तुम्हाला तुमचे आधार ई – केवायसी करावे लागेल.
यानंतर ते फोटो अपलोड करावा लागेल, त्यानंतरच तुम्ही तुमचे कार्ड डाउनलोड करु शकता.
आयुष्यमान भारत योजना
मोदी सरकारने २०१७ मध्ये ही योजना सुरु केली होती. आयुष्मान भारत ही जगातील सर्वात मोठी विमा योजना आहे, जी सध्या देशातील सर्वात गरीब ४० टक्के लोकांना दरवर्षी ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार प्रदान करते. राष्ट्रीय आरोग्य धोरणांतर्गत मोदी सरकारने २०१७ मध्ये ही योजना सुरु केली. मात्र, पश्चिम बंगालसह अनेक राज्ये ही योजना स्वीकारण्यास नकार देत आहेत आणि राज्यात स्वत:च्या योजना चालवत आहेत.
या योजनेअंतर्गत देशभरातील निवडक सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये उपचार करता येतात. या योजनेंतर्गत प्रवेशाच्या १० दिवस आधी आणि नंतरचा खर्च भरण्याचीही तरतूद आहे. या योजनेत सर्व आजारांचा समावेश आयुष्मान योजनेत करण्यात आला आहे. कोणत्याही आजारासाठी रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी आणि नंतरचा खर्च कव्हर केला जातो. यामध्ये वाहतुकीवरील खर्चाचाही समावेश होतो. यामध्ये सर्व वैद्यकीय चाचण्या, ऑपरेशन्स, उपचार इत्यादी गोष्टींचा समावेश आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत ५.५ कोटींहून अधिक लोकांनी उपचार घेतले आहेत.
भाजपने जाहीरनाम्यात आश्वासन दिले होते.
लोकसभा निवडणुकीत भाजपने आपल्या जाहीरनाम्यात आश्वासन दिले होते की, मोदी सरकार तिसऱ्यांदा सत्तेवर आल्यास ७० वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या सर्व नागरिकांना ५ लाख रुपयांचे मोफत उपचार केले जातील. सरकारने दिलेले आश्वासन पूर्ण करुन त्याला मंजुरी दिली आहे. सध्या आयुष्मान भारत योजने अंतर्गत पात्र कुटुंबांना वार्षिक ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळतात.