गणेशभक्तांवर दगडफेक, तलवारी नाचवणे, पेट्रोल बॉम्ब व चप्पल फेकल्याची संतापजनक घटना..!
ब्यूरो न्यूज | बेंगळुरु : देशभरात गणेशोत्सव उत्साहात सुरू आहे. दरम्यान, काही ठिकाणी गणेशोत्सवाला गालबोट लागलंय. कर्नाटकात मांड्या इथं गणेश विसर्जनावेळी हिंसाचाराची घटना घडलीय. दोन धर्मात झालेल्या वादातून परिस्थिती इतकी बिघडली की वातावरण तणावपूर्ण झालं. समाजकंटकांनी काही दुकाने बाइक शोरूम आणि कपड्याच्या दुकानांना आग लावली. यात दुकाने पूर्णपणे जळून खाक झाली आहेत.
रस्त्यावर उभा असलेल्या दुचाकींनाही आग लावण्यात आली. यामुळे तणाव वाढला असून दोन्ही समुदाय हिंसाचार करत आहेत. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी हाय अलर्ट जारी केला. कलम १६३ लागू केले आहे. लोकांना एकत्र जमण्यास आणि गर्दी करण्यास बंदी असून असं केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.
बदरिकोप्पलु गावातील तरुण गणपतची विसर्जन मिरवणूक काढत होते. मिरवणूक नागमंगलाच्या मुख्य रस्त्यावर असणाऱ्या मशिदीजवळून जात असताना काहींनी दगडफेक केली. यामुळे वातावरण बिघडलं आणि दोन्ही समुदायात वाद झाला. याचवेळी काही समाजकंटकांनी दुकानांची तोडफोड केली आणि वाहने पेटवली. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. संतापलेल्या लोकांनी पोलीस ठाण्यात आंदोलन करत या प्रकरणात जबाबदार असलेल्या लोकांना अटक करावी अशी मागणी केली.
केंद्रीय मंत्री एचडी कुमारस्वामी यांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला. ते म्हणाले की, या घटनेचा निषेध करतो. जाणीवपूर्वक गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीत भक्तांना टार्गेट करत दगडफेक आणि चप्पल फेकण्यात आले. पेट्रोल बॉम्ब फोडले गेले. तलवारी नाचवल्या गेल्या. शहरात शांतता आणि सुव्यवस्था अपयशी ठरल्याचं कुमारस्वामींनी म्हटलं.
सूरतमध्येही असाच प्रकार
गुजरातच्या सूरतमध्येही असाच प्रकार घडला होता. सूरतमध्ये एका गणपती मंडपावर समाजकंटकांनी दगडफेक केली होती. या घटनेनंतर संतापलेले लोक रस्त्यावर उतरले होते. लोकांनी कारवाईची मागणी करत पोलीस ठाण्याला घेराव घातला होता. पोलिसांनी या प्रकरणात ६ जणांना अटक केली होती. त्यानंतर आणखी २७ जणांनाही अटक करण्यात आलीय.