एस.टी .कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत दिला आमदार नाईक यांना उपरोधिक सल्ला…!
मालवण | वैभव माणगांवकर : महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब सातत्याने एसटी कर्मचाऱ्यांच्या विरोधात विधाने करत आहेत. न्यायालयामध्ये अवमान याचिका दाखल करण्याची भीती दाखवत आहेत एसटी कर्मचाऱ्यांचे निलंबन करत आहेत. असे असून सुद्धा महा विकास आघाडी सरकार संप मिटवण्यासाठी ठोस निर्णय घेताना दिसत नाही असे असताना सत्ताधारी पक्षाचे आमदार एसटी कर्मचाऱ्यांची भेट घेण्याची नोटंकी का करत आहेत ? असा सवाल मनसेच्या अमित इब्रामपूरकर यांनी केला आहे. कुडाळ मालवण मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांनी कर्मचाऱ्यांच्या समस्या, अडचणी जाणून घेतल्या. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, परिवहन मंत्री अनिल परब, अर्थमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन थांबविण्याबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.एसटी महामंडळाच्या दुर्दशेस शिवसेनेचे मंत्री जबाबदार आहेत.गेली सात वर्षे शिवसेनेकडे परिवहन खात्याचे मंत्रिपद आहे. एसटी महामंडळाचा कारभार सुधारण्यासाठी या खात्याच्या मंत्र्यांनी काहीच प्रयत्न केले नाहीत उलट वाटोळे केले. राज्यभरातील सुरू असलेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप आणखी चिघळला आहे कारण महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचं नुकसान आणि प्रवाशांचे हाल होत असल्याचा ठपका ठेवत विविध मागण्यांसाठी संप करणार्या वाहतूक नियंत्रकासह कर्मचार्यांचे निलंबन महाविकास आघाडी कडून राज्यभरात अनेक ठिकाणी करण्यात आलं आहे. निलंबन काळात संबंधित कर्मचार्यांनी आगार व्यवस्थापक यांच्या कार्यालयात हजेरी लावण्याचे आदेश दिले आहेत.
एसटी महामंडळात काम करणार्या कर्मचार्यांना अत्यल्प वेतन मिळते. त्यामुळे कुटुंब चालवणं त्यांना कठीण होत चाललं आहे. समान काम, समान वेतन या तत्त्वावर किमान वेतन कायद्यानुसार वेतन देण्यात यावे, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे आंध्रप्रदेश राज्याच्या धर्तीवर राज्य शासनात विलिनीकरण करण्यात यावं, अशी मागणी कर्मचार्यांनी केली. मात्र, या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे एसटी महामंडळातील कर्मचार्यांनी २९ ऑक्टोबरपासून कामबंद आंदोलन सुरू केलं. त्यानंतर त्यांनी संप पुकारला आहे.
या कारवाईने राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचार्यांकडून शासनाविरोधात प्रचंड रोष व्यक्त केला जात आहे. संप करणार्या अन्य कर्मचार्यांवर निलंबनाची टांगती तलवार सिंधुदुर्गातही आहे.एसटी कर्मचार्यांना दरवर्षी संप करावा लागतो.त्यामुळे आमदार वैभव नाईक यांनी मंत्र्यांना भेटून सरकारच्या निषेधाचे पत्र देत फोटोसेशन करावे असे मनसेच्या अमित इब्रामपूरकर यांनी म्हटले आहे.