एक सेनानी हरपला
कणकवली | उमेश परब : कणकवली तालुक्यातील लोरे नंबर १ चे सुपुत्र, सेवा निवृत्त लष्करी अधिकारी सुभेदार वासुदेव गंगाराम रावराणे( वय ९० )यांचे वृद्धापकाळाने बुधवारी पहाटे ३.३७ वाजता निधन झाले.भारतीय लष्करातून सुभेदार म्हणून ते १९७६ साली निवृत्त झाले होते.लष्करात असतांना १९५३साली कोरिया देशात भारतीय शांती सेनेतून ते गेले होते.१९६१ च्या गोवा मुक्ती संग्रामात त्यांनी भाग घेतला होता.१९६२ मध्ये चीन देशा विरुद्धच्या लढाईत गुवाहाटी बॉर्डरवर युद्धात सहभागी झाले होते.तर १९६५ मध्ये त्यांनी पाकिस्तान विरुद्धच्या लढाईत कच्छ आणि भुज च्या सीमेवरून सहभाग घेतला होता.तसेच १९७१ च्या बांगला देश निर्मितीत पाकिस्तानविरुद्ध अमृतसर भटींड्डा सीमेवरून युद्धात सहभाग घेतला होता.ते भारतीय लष्कराच्या १६ मराठा बटालियन मधून ३२ वर्षे देश सेवा करून १९७५ साली सुभेदार म्हणून निवृत्त झाले.संपूर्ण कारकीर्दीत ते देशाच्या सीमेवर कार्यरत राहिलेत.
निवृत्ती नंतर त्यांनी कृषी क्षेत्रात प्रगतशील शेतकरी म्हणून काम केले.समाजवादी विचार सारणीचे असल्याने त्यांनी माजी मंत्री प्रा.मधु दंडवते यांच्या सोबत जनता दलाचे काम केले.त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, तीन मुलगे,एक मुलगी,सुना ,नातवंडे असा परिवार आहे.
कणकवली उपजिल्हा रुग्णालयाचे माजी वैदयकीय अधिकारी, प्रसिद्ध डॉक्टर आणि पतंजलीचे जिल्हा समन्वयक डॉ.तुळशीराम रावराणे यांचे ते वडिल होत.