सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांची माहिती
कणकवली | उमेश परब : प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित फळ पिक विमा योजने अंतर्गत कोकणातील आंबा , काजू व केळी या पिकांचा समावेश होतो. या योजनेच्या निकषात बदल करण्यात आले असून याचा शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याची माहिती जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी दिली. कणकवलीत ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
श्री सावंत पुढे म्हणाले, गेल्या चार ते पाच वर्षात हवामानातील बदलामुळे उत्पादनात विपरित परिणाम होत आहे . मात्र फळ – पिक विमा योजनेमुळे शेतकऱ्याच्या उत्पादनास काही अंशी मदत होत आहे. चालू वर्षी आंबा व काजू या पिकापोटी जिल्हयातील २२.८५७ शेतकऱ्यांनी .६.९ ७ कोटी एवढी विमा हप्त्याची रक्कम शासनाकडे भरलेली होती . त्यापोटी हवामानातील निकषांस अनुसरून जिल्हा पिक उत्पादक शेतकऱ्यांना रु .५१.७१ कोटी एवढी रक्कम प्राप्त झाली आहे . यापैकी जिल्हा बँकेकडे ६,३०५ सभासदांना रू .१९.९ ३ कोटी एवढी नुकसान भरपाई मिळालेली आहे . हवामानातील असणारे अवेळी पाऊस व तापमान या निकषांमध्ये बदल करण्यासाठी जिल्हा बँकेने पुढाकार घेवून खासदार तथा माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली होती. त्यास अनुसरून गतवर्षी माहे नोव्हेंबर २०२० मध्ये संबंधित खात्याचे अधिकारी तथा पदाधिकारी यांची सभा घेवून निकषात बदल करण्याची विनंती करण्यात आलेली होती .मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व कृषीमंत्री दादा भुसे यांनी संबंधित कंपनीशी चर्चा करून चालू वर्षासाठी निकषामध्ये सुधारणा केलेल्या आहेत. पुढील ३ वर्षासाठी सदर सुधारीत निकष लागू राहणार असून रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी मार्फत केळी , आंबा व काजू या पिकांसाठी विमा उतरविला जाणार आहे. कोकणात प्रामुख्याने हंगामात अवेळी पाऊस व वाढलेल्या तापमानामुळे नुकसान होते . पूर्वीच्या निकषांप्रमाणे अवेळी पावसामध्ये ०१ एप्रिल ते १५ मे या कालावधीमध्ये २५ मि.मी. पेक्षा जास्त पाऊस झाल्यास शेतकरी नुकसानीस पात्र होता . मात्र आता पावसाचे प्रमाण १० मि.मी. असल्यास शेतकरी नुकसान भरपाईस पात्र होणार आहे. तसेच जास्त तापमानमध्ये ३ दिवसामध्ये ३७ डिग्रीपेक्षा जास्त तापमान झाल्यास गतवर्षी असणाऱ्या रु .६,१०० / – नुकसान भरपाईमध्ये वाढ होवून ती आता रु .१४,१०० मिळणार आहे . आंब्यासाठी हेक्टरी विमादर रू .७,००० / – तर काजूसाठी रु .५,००० / – एवढा असून , एक शेतकरी ४ हेक्टरपर्यंत योजनेत सहभागी होवू शकतो . यापूर्वी जिल्हयातील ३९ महसूल मंडळामार्फत कार्यवाही होत होती. मात्र आमदार वैभव नाईक व मी जिल्हयाचे पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे पाठपुरावा करून महसूल मंडळात वाढ करून घेतली आहे. आता महसूल मंडळांची संख्या ५८ एवढी झालेली असून , त्याचा लाभ जिल्हयातील शेतकऱ्यांना मिळणार आहे . सद्याच्या बदलत्या हवामानाचा विचार करता , आंबा – काजू पिकासाठी शेतकऱ्यांना विमा संरक्षणाची नितांत आवश्यकता आहे. कर्जदार शेतकऱ्यांनी कलम बाग असलेल्या ठिकाणचा जिओ टॅगींग फोटो मागाहून दिल्यास चालू शकेल . यावर्षी सदर विमा हप्ता भरण्याची अंतिम तारीख ही ३० नोव्हेंबर २०२१ असून , तत्पूर्वी शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हावयाचे आहे. सोसायटीच्या माध्यमातूनही या वर्षी या विमा योजनेत सहभागी होता येणार आहे. शेवटच्या दिवशी शेतकऱ्यांना विमा हप्ता भरण्यास अडचणी निर्माण होत असतात त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळीच विमा हप्ता भरण्याचे आवाहन बँकेचे अध्यक्ष सतिश सावंत यांनी केलेले आहे .