मालवण, ता. २६ : राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा
शिल्पकार व कन्सल्टंट यांच्या निष्काळजीपणामुळेच कोसळला आहे त्यामुळे त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकामच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत असे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज येथे स्पष्ट केले.
सायंकाळी जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी राजकोट किल्ल्यास भेट देऊन कोसळलेल्या पुतळ्याची पाहणी केली यानंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. राजकोट हा किल्ला या किल्ल्याच्या पुनर्बाधणीसाठी केलेले प्रयत्न याचे सर्वजण साक्षीदार आहेत. नौदल दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य असा पुतळा उभारावा असे म्हणणे नौदलच्या अधिकारी आणि त्यांच्या टीमचे होते. त्यानुसार आवश्यक बाबींची पूर्तता करून राजकोट किल्ल्याच्या तटबंदीचे जे काम आहे ते सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा सिंधुदुर्ग किल्ला येथे उभारायचा होता मात्र त्या ठिकाणी आवश्यक जागा न मिळाल्याने हा पुतळा राजकोट किल्ला येथे उभारण्याचा निर्णय नौदलच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी घेतला. यासाठीच्या कामासाठी ३६ लाख रुपयांचा निधी नौदलाला वर्ग करण्याचे काम शासनाच्या माध्यमातून करण्यात आले. नौदलाच्या सर्व अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली ही सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. पुतळ्याची निविदा प्रक्रिया तसेच अन्य बाबींची पूर्तता नौदल अधिकाऱ्यांच्या माध्यमातून झाली. या पुतळ्यामध्ये जेस्टील वापरण्यात आले. त्या स्टीलला खाऱ्या हवेमुळे गंज पकडली.
त्यामुळे ते स्टील निकामी झाले असण्याची शक्यता आहे. यासंदर्भात
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी याबाबतचे पत्र नौदल
विभागास अगोदरच पाठवून दिले आहे. आज जी घटना घडली आहे
ती सर्वच शिवप्रेमींना वेदना देणारी आहे. जो काही निष्काळजीपणा
झाला आहे यात जी काळजी घेणे आवश्यक होते ती पुतळा
उभारणाऱ्या शिल्पकारासह कन्सल्टंट यांनी घेतली नसल्याचे दिसून
येते. त्यामुळे या सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात यावा असे आदेश
आपण सार्वजनिक बांधकामाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.
आमदार वैभव नाईक यांच्यासह शिवप्रेमीकडून सार्वजनिक बांधकाम कार्यालयाची तोडफोड झाली ती जनभावना आहे. साहजिकच अशी घटना घडल्यानंतर शिवप्रेमीकडून घडलेली ही प्रतिक्रिया आहे. हे नेमके कशामुळे झाले याबाबत आमदार नाईक यांची समजूत काढली जाईल. मात्र यात जनभावनांचा आदर करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. पुतळा कोसळला ही घटना योग्य नाही. यात जे कोण दोषी असतील त्या प्रकरणाची सखोल चौकशी ही नौदल अधिकाऱ्यांमार्फत निश्चितच होईल. मात्र त्याचबरोबर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचेही याप्रकरणी लक्ष वेधून याच ठिकाणी पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दर्जेदार पद्धतीचा उभारण्याची कार्यवाही केली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले.