संपादकीय विशेष
नव्वदच्या दशकातील पाकिस्तानी क्रिकेट संघ हा खूप बलवान म्हणता येईल असाच होता. देशात,शारजात आणि अगदी भारतात येऊन चेन्नई आणि कोलकात्यात त्यांनी वरचष्मा गाजवलेला होता. वकार,वसीम,आकिब,शोएब,मोहम्मदअक्रमरुपी तोफ़ख़ाना आणि मुश्ताक व सकलेनरुपी फिरकीचे जंजाळ त्यांच्याकडे होते.इंझमाम, आमीर सोहेल,एज़ाज़ अहमद, सईद अन्वर, आसिफ मुजताबा, बसित अली, मोईन ख़ान व रशीद लतीफ यांसारखी चतुरस्त्र व खोल फलंदाजी होती. (हसन रझ़ासारखे सचिन तेंडुलकरशी चढाओढ करत, वयाच्या चौदाव्या वर्षी थेट आंतरराष्ट्रीय स्तरावर उतरवलेले एक फसफसलेले बालनाट्यही होतेच…!)
भरपूर प्रायोजक, देखणे व हुशार खेळाडू असाच तो संघ..!
परंतु त्या संघाची एक गोष्ट मात्र अधुनमधुन नक्कीच बाहेर येत होती आणि ती म्हणजे गांजा तथा च़रस यांच्या सेवनाचे आरोप.
वसीम आणि वकारवर ते सिद्धही झाले होते परंतु त्यावेळी त्यांचे एखाद्या सामन्यापुरते निलंबन किंवा आठवडाभराचा पुनर्वसन कार्यक्रम एवढीच काय ती उपाययोजना होती.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला जरी आपली बाळं प्रतिभावंत व गोंडस,गोजिरी वाटत होती तरी जगाला मात्र त्यांच्यातील नशेडीपणाची एक चीड नक्कीच होती. 1995 सालापर्यंत इंग्लंडमधल्या काऊंटी सामन्यांदरम्यानही फक्त पाकिस्तानी खेळाडुंच्या उत्तेजक चाचण्या जास्त वारंवारितेने होत असत.
कदाचित त्यामुळे जे पाकिस्तानी खेळाडू खरोखरंच स्वच्छ होते त्यांनाही एकाच तराजूत मापले जात होते.
2005 पर्यंत पाकिस्तान संघ हा विश्व क्रिकेटच्या सर्वोत्तम यादीत नियमीत होता परंतु तो सांघिकपणे जागतिक स्तरावर चाहत्यांना कधीच आपलासा वाटला नव्हता त्याला मुख्य कारणांपैकी एक “नशेबाजपणा” हे ही होतेच.
काळ बदललाय. 2012 पासून आय.सी.सी.चे औषध, उत्तेजके यांविषयीचे नियम अक्षरशः आजीवन बंदीच्या शिक्षेपर्यंत बदलले आहे. कालानुरूप पाकिस्तानची युवा पिढीही आरोग्य व आहार यांची सात्विकता समजू लागली असावी . त्याचाच परिणाम म्हणून थोडेफार वाचन, इंटरनेट यामुळे पाकिस्तानचा युवा क्रिकेटर हा चरस,गांजा आदींपेक्षा आहार,आरोग्य, मैदानावरील व बाहेरील वर्तन यांकडे निदान सहज अभ्यास म्हणून पाहू लागला असावा.
सध्याच्या पाकिस्तान संघाला अगदी भारतियांना हरवले तरी खूप काही आक्रस्ताळेपणाने करताना पाहिले गेले नाही.एखादा हसन अली असतो जो मैदानावर कमी पण मैदानाबाहेर वातावरण चिथवत असतोच..परंतु सरासरी पाकिस्तान संघ हा स्वतःच्या विजयाबद्दल खुश दिसला परंतु फक्त भारताच्या पराभवाबद्दल नक्कीच नाही.
जग नशामुक्तीच्या एका वेगळ्या संक्रमणातून जात आहे.नशेच्या पद्धती, प्रकार व घटकही बदलत आहेत. सूज्ञ भारतीय व क्रिकेट चाहत्यांना ‘क्रिकेटमध्ये केवळ चुरस पहायची आवड आहे…..च़रस नक्कीच नाही..!’
कुठलाच क्रिडापटू किंवा युवक चरस,गांजा यांच्यात अडकलेला पाहणे हे माणुस म्हणून खूप वेदनादायक असते.
कालच्या पाकिस्तानच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या रोमांचक पराभवानंतर पाकिस्तान ड्रेसिंग रुममधीलही वातावरण अतिशय निरोगी भासले. अनुभवाने समृद्ध असलेला गोलंदाजी प्रशिक्षक सकलेन मुश्ताक आणि कप्तान बाबर आज़म यांची थोडी अशुद्ध ऊर्दू,हिंदी व इंग्लिश मिश्रीत छोटेखानी भाषणे युवा चैतन्याला सकस अशीच होती.
कोपर्यामध्ये एखादा हसन अली जळफळतही बसला असेल किंवा नसेलही परंतु जगाचा एक संदेश पाकिस्तानच्या युवा क्रिकेट संघाने नक्कीच ऐकलेला दिसतोय..तो म्हणजे “क्रिकेटर व माणुस म्हणून च़रस नाही तर फक्त चुरस हवीय…!”
सुयोग पंडित.
(मुख्य संपादक)
पाकिस्तान क्रिकेट: सुंदर शब्दांकन.
🙏